हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव (ता. वाळवा) येथे पहिले शाहिरी लोककला संमेलन पार पडले. यावेळी मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, असा ठराव या संमेलनात करण्यात आला. तमाशा, शाहिरी या आपल्या लोककला जिवंत राहण्यासाठी लोकाश्रयाची गरज असताना आजच्या पिढीला मॉडेल लागते. तिला नाचायला आले नाही तरी चालते, अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली. ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची..’, ही लावणी सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
वाटेगाव (ता.वाळवा) येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकमध्ये राज्यातील पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाचे निमंत्रक डॉ. भारत पाटणकर, अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री साठे, नातू सचिन साठे, माजी सभापती रविंद्रकाका बर्डे, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, कॉ. विजय मांडके, ज्येष्ठ शाहीर अंकल सोनवणे, शाहीर शितल साठे, महेंद्र रोकडे उपस्थित होते. यावेळी शाहीर शितल साठे यांनी ‘माझी मैना गावावर राहिली’, ही अण्णा भाऊं ची छक्कड, तसेच ‘जागा हो जागा, शाहिरीच्या मिठाला, अण्णा भाऊंचे नाव द्या हो मुंबई विद्यापीठाला’, हे गीत सादर केले.
यावेळी मंगल बनसोडे म्हणाल्या की, माझे पती रामचंद्र बनसोडे हे लोकशाहीर अण्णाभाऊंकडून कथानक घ्यायचे. त्यातून आम्ही फकिरा, कृष्णाकाठचा फरारी, आवडी, डोंगरची मैना, अशी वगनाट्ये बसविली. ती राज्यातील रसिकांनी डोक्यावर घेतली. त्याचे सारे श्रेय अण्णा भाऊंना जाते, असे मंगला बनसोडेंनी सांगितले. मायबाप रसिकांच्या आशीर्वादाने माझ्या आजोबा, आईनंतर मलाही राष्ट्रपती पदक मिळाले.
https://www.facebook.com/hellomaharashtrasatara/videos/6407360912709748
कोरोनाच्या काळात तमाशा कलावंतांचे फार हाल झाले. त्यांना मी माझ्या परीने मदत केली. मात्र कोणीही मदतीला आले नाही, असे सांगत टीव्ही आणि सिनेमा बघता. त्याप्रमाणे रसिकांनी आम्हालाही प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंगला बनसोडेंनी यावेळी महाराष्ट्रातील रसिकांना केले.
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले की, हल्ली टीव्ही, मोबाईलने माणसाला चिटकवून ठेवले आहे. त्यामुळे आपणास लोककला ही आजच्या जीवनाची कला बनवावी लागेल. पोटासाठी नाचते मी..ही मंगला बनसोडेंची लावणी लोककलेच्या शोकांतिकेचे आर्त रूप आहे. विठ्ठलाच्या पंढरीप्रमाणे राज्यातील शाहीर, लोक कलावंतांची वाटेगाव ही पंढरी करण्याचा आपला प्रयत्न आहे.