Satara News : कोठडीत असताना आरोपीनं केलं असं काही की, अख्खं पोलिस खातं हादरलं; पहा नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |कराडमधील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने पोलीस कोठडीत स्वत:वर टोकदार शस्त्राने वार करून तसेच भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा. हडपसर, गाडीतळ, तुळजाभवानी वसाहत, ससाणेनगर, पुणे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कराडमधील शिंदे मळ्यात दवाखाना आणि वास्तव्यास असणाऱ्या डॉ. राजेश शिंदे यांच्या घरावर १० जुलै रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. आठ दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा सुमारे ४९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या दरोड्यात संशयित म्हणून ट्रान्सफर वॉरंटवरून येरवडा कारागृहातून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला इकडे वर्ग करण्यात आले होते.

कराडमधील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी, (दि. ४) रात्रीच्या सुमारास पोलिस कोठडीत त्याने स्वत:वर टोकदार शस्त्राने वार करून तसेच भिंतीवर डोके आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लॉकअपमध्ये जमा करताना पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही. मात्र, रात्री साडे आठच्या सुमारास लॉकअपमध्ये आरोपी सोनू उर्फ संजीव टाक याने बाथरूममध्ये डोके आपटण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने लॉकअपकडे धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रोपीने स्वत:च्या पोटावर टोकदार वस्तूने जखमा करून घेतल्याचे आढळून येताच त्याला तातडीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपनिरीक्षक मारूती चव्हाण हे या घटनेचा तपास करीत आहेत.

डॉ. शिंदे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित असल्याचा संशय

कराडमधील डॉक्टर राजेश शिंदे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हा याच संशयिताकडे असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. दरोडेखोरांची ही टोळी सराईत असून पोलिसांनी पकडल्यानंतर कोठडीत स्वतःला जखमी करून घेण्याचा प्रयत्न या टोळीतील दरोडेखोर करतात. या टोळीवर दरोड्याचे अनेक गुन्हे राज्यातील विविध भागात दाखल आहेत.