हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या कराड एसटी बसस्थानकावर महिला प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. या चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचनाही एसटी महामंडळ प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, काही महिलांच्या बेफिकिरीमुळे त्यांच्यावर आपली दागिने गमावण्याची वेळ येत आहेत. कराड बसस्थानकात अशीच घटना नुकतीच घडली असून बसमध्ये घाईगडबडीत चढण्याच्या नादात एका महिलेच्या गळ्यातील आपले तब्बल अडीच तोळ्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धामणी येथील अलका पाटील या कराड बसस्थानकात आपल्या गावी धामनीला जाण्यासाठी आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत पाठीमागून आलेल्या एका महिला चोराने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. गर्दीमध्ये प्रवाशी महिला कळणार इतक्यात चोरट्या महिलेसह असणारे तीचे दोन साथीदार बसस्थानकाबाहेर पळून गेल्या. नंतर याबाबतची फिर्याद अलका पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.
प्रवाशी महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर दुसऱ्यादिवशी पोलिसांनी संबंधित चोरटयाचा शोध घेतला. यावेळी पोलिसांना व प्रवाशांना एक महिला संशयितरीतीने फिरताना आढळून आली. त्यांनी तात्काळ संबंधित महिलेस ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेसोबत इतर तीन महिला असून त्यांचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.