औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा या २४ किलोमीटर अंतरात एकच उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांंच्याकडे पाठपुरावा सुरू असून भूसंपादनासह अंदाजे 2200 ते 3 हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर 2021 मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर निर्णय लवकरच होईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कराड म्हणाले, अखंड पूल बांधण्यापूर्वी त्याला इंटरचेंज कसा असावा, याचा विचार सुरू आहे. सहा ठिकाणी पुलावरून ये-जा करण्यास जागा द्यावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. याबाबत गडकरी यांच्यासोबत पुन्हा बैठक होईल. हा पूल झाल्यास औरंगाबादचे रुपडे बदलून जाईल. वाळूज ते डीएमआयसी नोडमधील सर्व उद्योग वसाहती कनेक्ट होतील. दळणवळणाचा मोठा ताण संपून जाईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल. यावेळी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, अभियंता नचिकेत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर काय होईल ?
पूर्ण 24 कि.मी. अंतरात पूल उभारणीसाठी जागा किती लागेल. मालमत्ता बाधित होतील काय, याची माहिती त्यात येईल. तसेच पूर्ण प्रकल्प कसा असेल, त्यातील तांत्रिक बाबी कशा असतील, डिझाईनची सगळी माहिती त्यात असेल. अंतरात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, सिडको उड्डाणपुलांचा समावेश आहे. 200 कोटींच्या आसपासचा खर्च या पुलांवर झाला आहे.
या पुलासाठी किती खर्च येईल ?
या पुलासाठी 100 कोटी प्रति किलोमीटर खर्च अपेक्षित आहे. 24 किलोमीटरच्या अंतरासाठी साधारणत: 2 ते 3 हजार कोटी रुपये लागू शकतील. यात भूसंपादन व इतर बाबींचा समावेश नाही. कामाला जेवढा कालावधी लागेल, त्या-त्या वर्षांतील कच्च्या मालाच्या वाढीव दराचा त्यात समावेश नसेल.