…अन् देवगिरी एक्सप्रेस दोन तास अंधारातच थांबली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – नगरसोल ते तारुर दरम्यान विद्युतीकरणातील 120 मीटर ओव्हरहेड वायर चोरट्यांनी लांबवली. यामुळे खांबांवर लटकलेली उर्वरित वायर अडकल्याने मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस तब्बल दोन तास अंधारात थांबण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन रेल्वे सुरक्षा बलाने अडकलेली वायर काढली आणि रेल्वे रवाना केली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, हे दोन तास अंधारात गेल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. मनमाड ते परसोडा दरम्यान रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ठिकाणी खांब उभारून ओव्हरहेड वायर टाकण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबर सिग्नल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी ठिकाणी साहित्य ठेवण्यात आले आहे. परंतु विद्युतीकरणाच्या कामाकडे चोरटे वळले आहेत.

नगरसोल ते तारुर दरम्यान खांबावर टाकलेली ओव्हरहेड वायर चोरून नेण्याचा प्रताप चोरट्यांनी केला. जवळपास 120 मीटर वायर लंपास केली. त्यामुळे उर्वरित वायर खांबावरून थेट रुळावर लटकली. अशा अवस्थेतील ही वायर देवगिरी एक्सप्रेस मध्ये अडकली आणि रेल्वे जागेवरच थांबवावी लागली. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अडकलेल्या वायर्स रेल्वे पुढे गेली असती तर विद्युत खांब कोसळले असते व रेल्वेस मोठा अपघात झाला असता, परंतु रेल्वे तात्काळ थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे नगरसोल ते तारुर दरम्यान ही रेल्वे दोन तास अडकल्याने देवगिरी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावत होती.

Leave a Comment