सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
अंगणवाडी कर्मचार्यांना दरमहा पेन्शन देणे नवीन मोबाईल तसेच मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला. प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांना मागण्यांचे निवेदन दिले.
अंगणवाडी कर्मचारी सेविकांच्या प्रश्नाबाबत गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आल. अंगणवाडी कर्मचार्यांना नवीन मोबाईल व निर्दोष मराठी पोषण ट्रॅकर एप्लीकेशन देण्यात यावे याबाबत गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केला जात आहे मात्र अद्याप मोबाईल मिळालेले नाही.
कर्मचार्यांसाठी कल्याण करी निधी स्थापन करावा याबाबत शासकीय आदेश काढला आहे. परंतु सेविका मदतनीस यांच्यासाठी अद्यापि कल्याणकारी निधी स्थापन करण्यात आलेला नाही. अंगणवाडी कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या अर्ध्या मानधन पेन्शन देण्याचे ठरले होते. त्यासाठी लागणारी रक्कम नगण्य आहे त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पेन्शनचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा अशी मागणी यावेळी केली.