कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन देण्यात आले. यावेळी अध्यक्षा नुरजहा शिकलगार, सचिव सुकेशनी गाडे, उपसचिव संगीता गुरव यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. कामांचा बोजा मात्र दररोज वाढत चालला आहे. आम्ही वेळोवेळी प्रकल्पापासून विधानसभेपर्यंत मोर्चे काढतो, आश्वासनांपलिकडे सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी असतांना महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅकर नावाचा अॅप इंग्लिशमध्ये अंगणवाडीला सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये अपलोड करायला सांगितला आहे. 2018 ला आम्हांला निकृष्ट दर्जाचे मोबाईल सरकारने दिले होते. त्यापैकी जादातर मोबाईल बिघडले आहेत. काहींवर ते अॅप डाऊनलोड होत नाहीत. आम्हांला इंग्लिश लिहीणे जमत नाही. परंतु स्थानिक अधिकारी मात्र खाजगी मोबाईल वापरा म्हणतात, धमक्या देतात आम्ही मानसेवी असतांना अपमानकारक बोलतात.
15 नोव्हेंबरला मुंबई विधानसभेवर अंगणवाडी कृती समितीने मोर्चा नेला. दिवाळीपूर्वी मानधनवाढ करणार असे सांगणरे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोर्चासमोर येऊन एक महिन्याची मुदत द्या, मी मानधनवाढ देणार सांगितले. पुढे काहीच झाले नाही, म्हणून नागपूर विधानसभेवर 27 डिसेंबरला मोर्चा गेला. तिथे मी सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांना भेटा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.
अंगणवाडी सेविकाच्या मागण्या पुढीलप्रमाणे-
१) अंगणवाडी कर्मचा-यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्या. दरम्यानच्या कालावधीत किमानवेतन सेविकांना व मिनी सेविकांना 18 हजार रुपये, मदतनीसना 15 हजार रुपये दरमहा द्यावेत.
२) सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत.
३) पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे.
४) कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे आत्ताचे दर तिप्पट करा.
५) अंगणवाडी कर्मचा-यांची सध्या भरती प्रक्रीया बंद केली आहे, तातडीने रिक्त जागा भरा.