हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कंबोडियामध्ये स्थित असलेले अंगकोर वाट मंदिर जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. हे मंदिर 800 वर्षे जुने असून ते 500 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या आकर्षणांपैकी अंगकोर वाट मंदिर एक आहे. अंगकोर वाट मंदिर मूळ हिंदू देव विष्णूला समर्पित होते, परंतु नंतर त्याचे रूपांतर बौद्ध मंदिरात करण्यात आले. दरवर्षी या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासाठी लाखोंपेक्षा अधिक पर्यटक कंबोडियामध्ये जात असतात. त्यामुळेच हे मंदिर इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे.
जगातील आठवे आश्चर्य बनलेले अंगकोर मंदिर दक्षिणपूर्व आशियातील सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्व स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर कंबोडियामधील सीएम रीपच्या उत्तरेकडील प्रांतात वसलेले आहे. विशेष बाब म्हणजे, अंगकोर वाट या मंदिराची जगातील सर्वात मोठी धार्मिक वास्तू म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. या मंदिराचे सौंदर्य अद्भुत असल्यामुळे लाखो पर्यटक मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. आजवर अनेक तज्ज्ञांनी आपापल्या पातळीवर या मंदिराचे वेगवेगळया पध्दतीने संशोधन केले आहे.
अंगकोर वाट मंदिराचा इतिहास
अंगकोर वाट मंदिर 800 वर्षांपूर्वी 12 व्या शतकात राजा सूर्यवर्मन राजाने बांधले होते. खरे तर, हे मंदिर हिंदू देवता विष्णूला समर्पित होते. परंतु, पुढे जाऊन या मंदिराचे बौद्ध मंदिरात रूपांतर करण्यात आले. ही बाब आपल्याला मंदिराच्या भिंतीवर कोरण्यात आलेल्या नक्षीदार आणि कोरीव कामातून स्पष्ट होते. असे म्हणतात की, या मंदिरामध्ये आठ हात असलेल्या विष्णू देवतेची मूर्ती होती. या मूर्तीला तेथील स्थानिक मनोभावे पुजत होते.
मंदिराचे आर्किटेक्चर
अंगकोर वाट मंदिर जगातील आठवे आश्चर्य बनण्याचे एक कारण म्हणजे मंदिराचे आर्किटेक्चर होय. सुमारे 500 एकरात पसरलेल्या या मंदिरावर बारीक आणि नक्षीदार काम करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये कमळाच्या आकाराचे पाच मनोरे आहेत. जे मेरू पर्वताचे प्रतिनिधित्व करतात. त्याचबरोबर या मंदिरावर महाकाव्यांतील दृश्ये, ऐतिहासिक घटना, त्या काळातील दैनंदिन जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. अशा अनेक बाबींमुळे हे मंदिर सर्वात आकर्षित ठरते. सूर्योदयावेळी तर मंदीर आपल्याला गुलाबी, केशरी, सोनेरी अशा वेगवेगळ्या रंगांच्या छटांमध्ये दिसते. हा नजारा डोळे दिपवून टाकणारा असतो.