Wednesday, June 7, 2023

अनिल देशमुख प्रकरण: त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही; काँग्रेसचा ईडीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट ईडीला च काही सवाल केले आहेत. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी व त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कंपनीच्या उरण येथील जमिनीची ईडी चौकशी करत असून सदर जमिनीची किंमत ३०० कोटी रुपये आहे अशा काही माध्यमातून बातम्या आल्या होत्या. ईडीने सदर मालमत्ता जप्त करताना ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे असे जाहीर केले आहे. मग या वावड्यांना वेळीच ईडीने उत्तर का दिले नाही?

सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी दिल्याची माहिती जर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांना होती, तर त्यांनी तेव्हाच कारवाई न केल्याबद्दल परमबीर यांची चौकशी ईडी कडून का होत नाही?, तसेच ज्या बार मालकांनी वाझेला पैसे दिले आणि ते पैसे वाझेने अनिल देशमुख यांना दिले असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या बार मालकांवर अजून कारवाई का करण्यात आलेली नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

ईडीनं अद्याप यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. त्यामुळंच या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशानं आणि महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूनं केल्या जात आहेत या आमच्या म्हणण्याला बळ मिळत आहे,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.