मुंबई | धुळे पालिकेच्या राजकारणावरुन नाराज असलेले भाजपा आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात भाजपची चांगलीच धुलाई केली. पक्ष वाढवण्याच्या नावाखाली वाल्या कोळ्यांच्या टोळ्याच्या टोळ्या पक्षात दाखल होत आहेत. ३०२ चे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना प्रतिष्ठा देणार का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आमदार अनिल गोटे यांच्या पत्नीवर भाजपच्याच स्थानिक पदाधिका-याने आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा मेसेज सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. त्याचा मुद्दा गोटे यांनी उपस्थित केरत ‘राज्यात आमदाराची पत्नी सुरक्षित नसेल तर इतरांची काय कथा’ असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘भर सभेत एकाने माझ्यावर पिस्तुल रोखले. एका डॉक्टरने ते हिसकावून घेतल्यामुळे मी सभागृहात उभा आहे. अशा गुन्हेगारीविरोधात मी गेली अनेक वर्ष लढलो. पण माझ्या आत्मसन्मानाला माझ्याच पक्षाने ठेच पोहोचवली’ अशी खंत ही गोटे यांनी बोलताना व्यक्त केली.
माझ्या पत्नीवर अश्लील शेरेबाजी करणा-याला पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच पक्षात प्रवेश दिला आहे. वाल्याचा वाल्मिकी करु, असे पक्षाचे नेते सांगतात. पण पक्षात आज वाल्या कोळ्यांच्या टोळ्या दाखल होत आहेत. ३०२, ३९५ चे गुन्हे दाखल असणा-यांना प्रतिष्ठा देणार का, असा सवाल त्यांनी केला. गुन्हेगारांवर कारवाई करतो, चौकशी करतो अशी पोकळ आश्वासने मला देऊ नका. आज तुम्ही सुपात आहात, उद्या जात्यात असाल असा इशारा देत
हमको मिटा सके
जमाने मे ऐसा दम नही
जमाना हम से है
जमाने से हम नही,
असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची तात्काळ चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.