पशुसंवर्धन विभागाने लम्पी त्वचारोगाचे गांभीर्य वेळीच ओळखावे : खा. छ. उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जनावरांना अतिशय घातक अशा लम्पी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. मानवातील कोरोना सारखाच या लम्पी विषाणुची लागण गाई- म्हैशीसह इतर जनावरांना होत आहे. याचा प्रादुर्भाव वाढल्यास, जनावरे दगावून, मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच दुधाचा तुटवडा निर्माण होईल. वेळीच पशुसंवर्धन विभागाबरोबरच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी याचे गांभीर्य ओळखावे. जनावरांचे लसीकरणासह, विलगीकरण करुन, रोगोपचार करावेत. तसेच शेळ्या- मेढ्यांच्या बाबतीत आणखी नवीन कोणताही प्रादुर्भाव होवू नये. या करीता सावधानता राखून, प्रतिबंधात्मक उपाय योजावेत अशा सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना राज्यसभा खा. छ. उदयनराजे यांनी केल्या आहेत.

खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे की, राज्यातील जनावरांमध्ये, लम्पी विषाणुचा शिरकाव झाला आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून तातडीने सरकारने निर्णय घ्यावेत अशी विनंती सूचना, आम्ही राज्याचे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचेशी चर्चा करताना केली आहे. सातारा जिल्ह्यात पशुधन चांगल्या प्रमाणात आहे. तसेच जिल्ह्यात पशुधनापासून दुध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती होत आहे. पुणे तसेच मुंबईला सातारा जिल्हा दुध पुरवठा करीत आहे. अशा परिस्थिती लम्पी रोगाचा फैलाव वाढल्यास, पशुधन दगावून मोठी हानी होईल. दुध उत्पादक शेतकरी कोलमडुन जाईल. समाजाला दुधाच्या तुटवड्याचा सामना करावा लागेल. सामान्य जनतेचे सुध्दा अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होवू नये किंवा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग यांनी समन्वयातुन मोठया प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाचे नियोजन करावे.

सुदैवाने, शिरवळ येथे व्हेटर्नरी कॉलेज आहे. जिल्ह्यात बोरगांव, रहिमतपूर, फलटण, कराड इत्यादी ठिकाणी कृषी शाळा व महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पशुवैद्यकीय विभागाने, जिल्ह्यातील तालुकानिहाय पशुधनांचे सर्वेक्षण करुन, प्रत्येक जनावराचे लसीकरण करावे. लक्षण असलेल्या जनावरांचे शासनस्तरावर विलगीकरण करुन, उपचार करावेत. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी सोपवावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातुन या मोहिमेचे नियंत्रण करावे. राज्याला मार्गदर्शक असे काम सातारा जिल्ह्यात करणेत यावे, आदी सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना केल्या आहेत.

दरम्यान, लम्पी रोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाय आणि रोगावरील उपचार इत्यादी बाबत राज्यातील पशुधन- शेतकरी बांधवांमध्ये, प्रबोधनात्मक जाणिवजागृती निर्माण करण्यासाठी, सेवाभावी- सामाजिक स्थांनी सामाजिक भान राखुन आपली जबाबदारी उचलावी. पशुसंवर्धन विभागानेच नव्हे तर शासनाच्या सर्व विभागांनी योग्य ती जबाबदारी पार पाडून, गांभिर्यपूर्वक सतर्क राहुन लम्पी विषाणु रोग संकटाचा सामना केला पाहिजे असे आवाहन खा. उदयनराजे यांनी केले आहे.