कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो, त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यंतींना परवानगी मिळाल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर खिलार जातीच्या बैलाच्या शर्यंती होत आहेत. तेव्हा शर्यंतीमुळे जनावरे एकत्रित येण्याचे मोठे प्रमाण बैलगाडी शर्यंतीमुळे होत आहे. तेव्हा लम्पी स्किन आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बैलगाडी शर्यतींही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृह पाळीव जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजनां संदर्भात पशुसंवर्धन विभागाची तातडीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीस कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अनिल देशपांडे, सहाय्यक आयुक्त लघु पशुचिकित्सालय कराड डॉ. बी. डी. बोर्डे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कराड डॉ. दुर्गदास उंडेगांवकर, सर्व पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.
या संसर्गजन्य रोगविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजचे आहे, त्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या गावी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यावंर जाऊन आवश्यकत्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केल्या.