हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आरोपींविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया या प्रकरणातील चौकशीसाठी सतत पाठपुरावा करत आहेत. त्यांनी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींविरोधात काही ठोस पुरावे सादर केले आहेत. यापूर्वी विष्णू चाटे या आरोपीला बीडऐवजी लातूर कारागृहात हलविण्याच्या निर्णयावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन बीडमधील परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
अंजली दमानिया यांनी आरोप केला की, “धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस व टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले?” मंत्री किंवा आमदारांना लाभाच्या पदांवर राहता येत नाही, त्यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते.
त्याचबरोबर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची चौकशी करावी, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. यासह “जगमित्र शुगर मिल्सला ६२ कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ईडी आणि सीआयडीने हस्तक्षेप करावा, असे त्यांनी स्पष्ट म्हणले.
यावेळी त्यांनी, वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. “ताजी पुरावे समोर आल्यानंतरही त्याला पोलीस कोठडी का देण्यात आली नाही?” हा प्रश्न त्यांनी विचारला. दरम्यान, “पोलिसांनी खंडणी प्रकरणात वेळीच योग्य कारवाई केली असती, तर संतोष देशमुख यांचा मृत्यू टाळता आला असता.” असे दमानिया यांनी म्हणले.