अहमदनगर प्रतिनिधी | लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करण्याबाबत आमरण उपोषणाला बसलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. “८ फेब्रुवारी पर्यंत सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करावीत अन्यथा मी मला मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करेन” असा इशारा हजारे यांनी दिला आहे. राळेगणसिद्धी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हजारे यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याने राजकिय वर्तुळात नव्या चर्चांना पेव फुटला आहे.
मोदींनी लोकांच्या विश्वासाचा भंग केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी झाली होती तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली होती. मात्र अद्याप यातील एकही मागणी मान्य झाली नसल्याने ते उपोषणाला बसले आहेत. ‘पुढील काही दिवसात मोदी सरकारने जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण न केल्यास मी मला मिळालेला पद्मभूषण पुरस्कार ८ फेब्रुवारी ला सरकारला परत करेन’ अशा शब्दात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला इशारा दिला आहे .
अण्णा हजारे यांचा उपोषणचा आज सहावा दिवस आहे तरी त्यांची प्रकृती खालावता चालली आहे. मात्र अण्णा हजारे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. रविवारी जसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन उपोषण मागे घेण्यास मनधरणी केली. मात्र लोकपालाची नियुक्ती होत नाही तोवर उपोषण सुरु राहणार राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.