पुणे (प्रतिनिधि): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) पुणे शहर अध्यक्षपदी लालचंद कुवर यांची, तर कार्याध्यक्षपदी विशाल विमल यांची निवड झाली आहे. स्वप्नील भोसले यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. 2024 या वर्षीसाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रा. दिगंबर कटयारे यांनी दिली.
एस एम जोशी सभागृह येथे शनिवारी झालेल्या वार्षिक बैठकीत पुणे शहर शाखेची कार्यकारिणी निवडण्यात आली. महा. अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष विकास सूर्यवंशी, जिल्हा पदाधिकारी मनोहर पाटील, सतीश जाधव आदी उपस्थित होते. शाखेच्या विविध उपक्रम विभाग कार्यवाहपदी विनोद लातूरकर, सहकार्यवाहपदी घनश्याम येणगे, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाहपदी निशांत धाईंजे, सहकार्यवाहपदी वैशाली कळसाईत, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाहपदी प्रतीक पाटील, महिला सहभाग विभाग कार्यवाहपदी माधुरी गायकवाड, युवा सहभाग विभाग कार्यवाहपदी मयूर पटारे, सांस्कृतिक अभिव्यक्ति विभाग कार्यवाहपदी प्रवीण खुंटे, आंतरजातीय धर्मीय विवाह विभाग कार्यवाहपदी पुनम जाधव, सोशल मीडिया विभाग कार्यवाहपदी रतन नामपल्ले यांची निवड करण्यात आहे.
पुण्यासारख्या शिक्षित शहरातही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. अंधश्रध्देच्या क्षेत्रात संघटितपणे बुवाबाजी, फसवणूक, शोषण असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पुढील काळात संघटितपणे काम करून अंधश्रद्धांचे निर्मूलन केले जाईल, असे विशाल विमल यांनी सांगितले. पुणे शहर शाखा ही पुण्यातील महत्वाची शाखा असून त्यांच्यासमोर नवनव्या अंधश्रद्धांच्या निर्मूलनाचे आव्हान आहे, असे दिगंबर कट्यारे यांनी सांगितले. यावेळी स्वप्नील भोसले, विनोद खरटमोल, घनश्याम येणगे, माधुरी गायकवाड, मयूर पटारे, पूनम जाधव, ग्यानोबा सपकाळे, आकाश भोर, प्रवीण खुंटे यांनी मनोगत व्यक्त केले.