नांदेड – जिल्ह्यातील बनचिंचोली (ता.हदगाव) येथील गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून प्राध्यापकांसह तीन मुलीविरुद्ध रॅगिंग घेतल्याप्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानवीय घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयात एका मुलीने आठ दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता. हाॅस्टेलमध्ये राहत असताना आरोपींनी तिची रविवारी (ता.१२) दुपारी छेडछाड करून कपडे काढ, नाक घास, झाडू मार अशा प्रकारे रॅगिंग केली. त्यामुळे त्याची तक्रार करण्यासाठी ती प्राध्यापक भगीरथ शिंदे यांच्याकडे गेली. त्यावेळी प्राध्यापक शिंदे याने त्याबाबत कार्यवाही केली नाही. उलट प्राध्यापकानेच वाईट हेतुने वागणूक दिली. तसेच शिक्षणामध्ये तुझे नुकसान करतो असे म्हणून जातीय भावनेतून कृत्य केले असल्याची तक्रार फिर्यादी मुलीकडून देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत महाविद्यालयातील इतर मुलींनी पोलिस ठाण्याबाहेर मंगळवारी (ता.१४) रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत प्राध्यापकाला पोलिस बाहेर सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने हा विषय चर्चेचा ठरला. दरम्यान, याबाबत हदगाव पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह महाराष्ट्राचा छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम १९९ कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्याकडे आहे.