पाटण | एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाटण येथे बसलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी आंदोलनस्थळी देवून अधिकारी व शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
पाटण आगारातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पाटण बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी अचानक पाटण आगारातील अधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांना याठिकाणावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जावून आंदोलन करा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबतची माहिती समजताच विक्रमबाबा पाटणकर, भाजपाचे फत्तेसिंह पाटणकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेवून त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. यावेळी भाजपाचे फत्तेसिंह पाटणकर यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनास आपला पाठींबा दिला.
सोमवारी पाटणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. 15 रोजी पाटणमधील सर्व एसटी कर्मचारी यांचा पाटण बसस्थानकापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे निवेदन तहसीलदार, पाटण पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे. यावेळी गणेश कांबळे, लक्ष्मण टोपले, माया पाटोळे, बापूराव चव्हाण, नागेश भद्रे, शशिकांत पाटील, प्रफुल्ल मुळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.