संत गोरोबा कुंभार साहित्यनगरी | उस्मानाबाद
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांचा शुक्रवारी सर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी चालू घडामोडींवर प्रभावी, मुद्देसूद भाषण केलं. मयूर डुमणे यांनी त्याचं शब्दांकन केलं आहे.
नुकत्याच झालेल्या हैद्राबाद येथील घटनेने सारा देश हादरला, दुर्देवाने आपल्या देशात दर दिवशी होणाऱ्या बलात्काराच्या घटना ही अगदी सामान्य बाब झालीय.या प्रकरणात दोन्ही कारणांनी माणुसकी पणाला लागली. बलात्कार करून निर्भयपणे जाळून टाकलं म्हणून आणि नंतर स्वतःच न्यायाच्या भूमिकेत जाऊन पोलिसांनी एन्काऊंटर केला तेव्हा अवघ्या समाजान, माध्यमांनी, पक्ष प्रतिनिधींनी पोलिसांवर फुलं उधळतं कौतुक केलं तेव्हाही वाचा, विवेकशून्य प्रतिक्रिया, जन सामन्याचा उन्माद अंगावर काटा आणणारा होता. न्याय प्रक्रियेला अक्षम्य उशीर होत असल्याने लोकांची सहनशिलता संपेल हे खरं आहे पण तरी पोलिसांनी स्वीकारलेला आणि लोकांनी स्वागत केलेला हा मार्ग अतिशय धोकादायक आहे. गुन्हे करणाऱ्यांच्या बाबतीत जेव्हा हे प्रच्छन्न स्वातंत्र्य सर्व सामान्यही अजमावतील आणि न्याय हातात घेतील त्यावेळेस व्यवस्थेकडे कोणती उत्तरं असतील हा प्रश्न सतत माझ्या मनात येतो. आज सर्वत्र सतत घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे झटपट न्याय लोकांना आकर्षित करतोय. समाजाची मानसिकता ही तशीही कायम भावनेवर व तात्कालिक घटनांवर आधारित असते. या सवंग लोकप्रियतेचा वापर मतांसाठी करणं हे भयानक आहे. कोणत्याही काळात जगणं हे तसं कठीणच असतं. आजचा काळही तसाच आहे. अराजकाच्या सावल्या आपल्या माथ्यावर घोंगावत आहेत.
लोकशाहीचीच नव्हे तर मानवी मूल्यांची, हक्कांची घुसमट सोसताना बुद्धीचा आणि मानवी मनाचाही थरकाप होतोय. माणसाला आतल्या संघर्षाला नव्हे तर बाहेरच्या संघर्षालाही निकराने सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रकारांच्या उन्मादाला ठरवून खतपाणी घातलं जातंय. मग ते पोलिसांनी केलेलं एन्काऊंटर असो वा गोमांस बाळगल्याच्या खऱ्या खोट्या संशयातून केलेलं मॉबलिंचिंग असो की बेगडी देशप्रेमाचे उमाळे असोत की धर्माचे प्रश्न, महिलांवर होणारा हिंसाचार. या अनेक गोष्टींवर सामान्य माणसापासून ते ज्यांनी काही एक नैतिकता व विवेक बाळगावा अशी अपेक्षा असते त्या सत्ताधाऱ्यांपर्यंत कोणीही असो त्यांनी उधळलेली मुक्ताफळ ऐकताना माणूस असल्याची लाज वाटायला लागते.
जगभरात सत्ता आणि शोषण एकत्रच नांदते हे खरं आहे पण आपल्या निलाजरेपणाला आणि कोडगेपणाला तोड नाही.आज परिघाबाहेरच्या माणसांची जगण्याची आत्यंतिक धडपड आणि या संघर्षात त्यांच संपत जाणं ही कोणाच्या खिजगणतीत नसलेली गोष्ट झाली आहे. शेतकरी, ऊसतोड करणारे कामगार, गावोगावी स्थलांतर करत हातावर पोट भरणारे असोत आम्ही वारंवार संविधान आणि त्याच पावित्र्य जपण्याच्या गप्पा मारतो. या संविधानाने दिलेली कोणतीच गोष्ट साधा जगण्याचा मूलभूत अधिकारही असंख्यांपर्यंत पोहचत नाही आणि समूहाच्या समूह नष्ट होत राहतात, ज्यांची नोंदही कुठे नसते. मला माहित आहे अशा अनेक प्रसंगात व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं नुसतं गरजेचं नव्हे तर कोणत्याही माणसाची, कवी, कलाकारांची जबाबदारीच असते. मात्र ही कलावंत माणसंच असतात आणि आपल्या शब्दांमधून व्यक्त होण्यापलीकडे त्यांच्याही हातात काही नसतं. याचीही त्यांना किंमत चुकवावी लागते.
आपण सर्वजण अतिशय सवंग, ढोबळ प्रतिकांच्या बुद्धीहीन वापराने निर्माण होणाऱ्या उन्मादाचे बळी ठरतो आहोत पण लिहिणं ही जर एक सामाजिक कृती असेल तर आमचं उत्तरदायित्व सामाजिक आणि समाजाशी जोडलं जायला हवं.
कोणी कितीही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी हजारो मनांमध्ये जिवंत असलेला एक उघडा वागडा कृश म्हातारा काठी टेकवत देशाच्या नकाशावरून चालणारा माझ्या कल्पनेत दिसतो आणि माझ्या अस्तित्वाला बिलगलेले माणूसपणाचे काही कण उजळून जातात.