सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा तालुक्यातील वर्णे येथील धावपटू अनुष्का कुंभार हिने कुवेतमधील एशियन ॲथलेटिक्स स्पर्धेत गगनाला गवसणी घातली. तिने ‘मिडले रिले’ या स्पर्धेत सुवर्ण व 400 मीटर वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या सुवर्ण यशामुळे साताऱ्याचा सातासमुद्रपार झेंडा फडकला आहे.
ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य कुटुंबातील अनुष्काने कामगिरीतील सातत्य कायम राखले आहे. वर्णेचे माजी सरपंच दत्तात्रय कुंभार यांची ही कन्या आहे. स्वतःमधील नैसर्गिक कौशल्याला मेहनतीची जोड देत तिची ॲथलेटिक्समध्ये सातत्यपूर्ण व कामगिरी सुरू आहे. अनुष्का यावर्षी ऑगस्टमध्ये पार पडलेल्या कोलंबिया येथील जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाली होती. तिची एकाच वर्षातील ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. कुवेत येथे युथ एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते.
आशिया खंडातील 33 देशांतील 400 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत चार बाय 300 मीटर (मिडले रिले) धावण्याच्या स्पर्धेत तिने भारतीय संघासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. स्पर्धेतील 400 मीटर धावण्याच्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात तिने कांस्य पदक पटकाविले आहे. अनुष्काने यापूर्वी भोपाळ (मध्य प्रदेश) येथे आयोजित राज्य मैदानी स्पर्धेतही यश संपादन केले होते. प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे. तिने पदकांची कमाई केल्याने कौतूक होत आहे.
अनुष्काचा उद्या वर्णेत भव्य मिरवणूक व नागरी सत्कार
आंतरराष्ट्रीय धावपटू व सुवर्णपदक विजेती अनुष्का कुंभार हिचा गुरुवार, दि. २० रोजी वर्णे येथे ग्रामस्थांच्यावतीने भव्य मिरवणूक काढून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात येणार आहे.