Thursday, March 30, 2023

साताऱ्यात एक एकर जागेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीस मान्यता : खा. उदयनराजे

- Advertisement -

सातारा | हद्दवाढीमुळे सातारा शहरात समाविष्ट झालेल्या गेंडामाळ भागातील सुमारे एक एकर जागेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी प्लॅन्ट) उभारण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे प्रमुख खा. उदयनराजे भोसले यांनी दिली.

याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात उदयनराजेंनी म्हटले आहे की, सातारा शहरातील भुयारी गटार योजनेत सदरबझार येथील पुरुष भिक्षेकरीगृह परिसरातील शासनाच्या जागेत हा प्रकल्प उभारण्याचे 2017 साली ठरवण्यात आले होते. तथापि, तीन-चार वर्षे पाठपुरावा करूनही शासनाकडून जागा मिळत नसल्याने सातारा विकास आघाडीने पालिकेच्या जागेत हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. सुधारित भुयारी गटार योजनेतील या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने, योजनेचा महत्त्वाचा टप्पा साविआने पूर्ण केला आहे.

- Advertisement -

शहराची पुढील 25 वर्षांची लोकसंख्यावाढ विचारात घेऊन, भुयारी गटार योजना राबवण्याचा निर्णय साविआने 2017 साली घेतला. शहराचा पूर्व, मध्यवर्ती व पश्‍चिम, असे एकूण तीन भाग पाडून ही योजना आखण्यात आली. केंद्र सरकारचा 50 टक्‍के आणि राज्य सरकार व पालिका यांचा प्रत्येकी 25 टक्‍के निधी, अशा सुमारे 51 कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली. या योजनेतील एसटीपी प्लॅंटसाठी पुरुष भिक्षेकरीगृहाच्या परिसरातील शासनाची जागा निश्‍चित करण्यात आली होती. पालिकेच्या जागा मागणी प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 2017 मध्येच जागा देण्याची शिफारस राज्य शासनाला केली.

या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा करूनही शासकीय जागा मिळत नसल्याने आणि पालिकेची हद्दवाढ झाल्याने, हद्दवाढीच्या भागातील पालिकेच्या मालकीच्या करंजे येथील स. नं. 387-अ, 387-ब आणि 410 येथील जागेपैकी सुमारे एक एकर जागेत हा प्रकल्प उभारण्याच्या आणि हद्दवाढीच्या अनुषंगाने भुयारी गटर योजनेचा सुधारित प्रस्ताव पालिकेने शासनास सादर केला होता. साविआने पालिकेच्या माध्यमातून सुचवलेल्या जागेत हा प्रकल्प उभारण्यास जीवन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. सुधारित भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाल्याने, मलनिस्सारणाची व्यवस्था होणार आहे.