दमरेचा मनमानी कारभार ! एक डेमू सूरु तर एक केली बंद

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कालपासून काचीगुडा रोटेगाव काचीगुडा डेमू एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, ही रेल्वे सुरू केली, तर दुसरीकडे रोटेगाव- नांदेड- रोटेगाव रेल्वे कालपासून अचानक बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांकडून दक्षिण-मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना प्रादुर्भावास प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड- रोटेगाव- नांदेड ही विशेष डेमू रेल्वे सुरु करण्यात आली होती. दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरत होती. यानंतर प्रवाशांच्या वाढत्या मागणीला लक्षात घेऊन काचीगुडा- रोटेगाव- काचीगुडा रेल्वे देखील सोमवारपासून बिना आरक्षित म्हणून सुरू करण्यात आली. यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत आता दोन रेल्वे राहतील अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाडा सोबत सावत्र पद्धतीची वागणूक सुरूच असून काचीगुडा- रोटेगाव- काचीगुडा डेमो सुरू करण्यात येताच नांदेड- रोटेगाव- नांदेड ही डेमू बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दोन रेल्वे पुन्हा सुरू –
कोरोना प्रादुर्भावानंतर निजामाबाद- पुणे ही रेल्वे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे निजामाबाद रेल्वे स्थानकावरून 17 नोव्हेंबर पासून दररोज रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी सुटून नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, अहमदनगर, दौंड मार्गे पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी दौंड ते निजामाबाद अशी धावणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे सोमवारपासून दररोज सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी सुटून अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद, परभणी, नांदेड मार्गे निजामाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.