औरंगाबाद : कोरोना काळात फीमध्ये सवलत म्हणून पंधरा टक्के रक्कम वार्षिक रकमेतून शाळेतर्फे कमी करण्यात यावी असे परिपत्रक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. असे असताना हे परिपत्रक फेटाळून शाळेचे संचालक मनमानी कारभार करून पालकांकडून हवी तेवढी फीस वसूल करत असल्याचे समोर आले आहे.
हडको एन 11 येथे असलेल्या एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल या शाळेच्या विध्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस 10 हजार रुपये घेण्यात आले होते. त्याचबरोबर त्यातील काही विध्यार्थ्यांची अर्धी फीस बाकी आहे. आता हे विध्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या पालकांनी शिक्षण मंत्र्यांच्या पंधरा टक्के सवलतीच्या परिपत्रकाप्रमाणे वार्षिक फीस मधून पंधरा टक्के रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी केली असता या शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे परिपत्रक फेटाळून लावले आहे.
“तुमच्या अनामत रकमेतुन शाळेची बाकी असलेली फी अजिबात वळती करून घेण्यात येणार नाही, तसेच पंधरा टक्के फी माफिची सवलतही तुम्हाला देण्यात येणार नाही. तुमच्या कडे बाकी असलेली सर्व फीस लवकर शाळेकडे जमा करावी, त्यानंतरच तुम्हाला विद्यार्थ्यांची टी. सी. आणि मार्कशीट देण्यात येईल. त्याचबरोबर टी. सी. मिळाल्यानंतरच तुम्ही डिपॉझीट किंवा अनामत रक्कम परत मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज करा, काही दिवसांनी
तुमच्या अनामत रकमेचा चेक तुम्हाला देण्यात येईल.” असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा माने आणि पर्यवेक्षिका सौ. शुभदा पुरंदकर म्हणाले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी औरंगाबाद, शिक्षण अधिकारी औरंगाबाद, तसेच पोलीस आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे कार्यवाहीस्तव सादर करण्यात आले आहे.