बाप तसा बेटा!! अर्जुन तेंडुलकरचे रणजी पदार्पणात शतक

arjun tendulkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच दमदार शतक ठोकलं आहे. सचिन तेंडुलकरनेही 34 वर्षांपूर्वी डिसेंबर 1988 मध्ये रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात गुजरातविरुद्ध शतक ठोकलं होतं.

अर्जुन गोव्याच्या संघाकडून रणजी खेळत आहे. यावेळी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने राजस्थानविरूद्ध 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याच्या संघाने 5 बाद 210 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर अर्जुन तेंडुलकरने सुयश प्रभूदेसाईसोबत जबरदस्त भागीदारी केली. 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अर्जुनने 207 चेंडूत 120 धावा काढल्या. या खेळीदरम्यान त्याने 16 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली.

अर्जुनशिवाय सुयश प्रभुदेसाई यानेही दमदार खेळी केली. सुयश सध्या 192 धावांवर खेळत असून तो द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे. अर्जुन आणि सुयशने सहाव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी रचत गोव्याला 140 षटकात 443 धावांपर्यंत पोहचवले आहे. दोन्ही फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर थेट हल्ला चढवला. दरम्यान, सचिन तेंडुलकरने 1988 मध्ये गुजरातविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मुंबईकडून खेळताना सचिनने पहिल्याच डावात शतक केलं होतं. तेव्हा सचिन फक्त 15 वर्षांचा होता तर अर्जूनने 23 वर्षाच्या वयात ही कामगिरी केली आहे.