औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कंबर कसत आहे. मात्र नागरिकांतही निर्बंधांबाबत उदासीनता असून यामुळे अनेक ठिकाणी पोलिस नागरिक वादावादी पहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद शहरात बुधवारी संध्याकाळी अनुभवायला मिळाला. एका लष्करी जवानाने एक पोलिस अधिकार्याला जबर मारहान केल्याने काही वेळ वातावरण तापले होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील नगर नाका येथे पोलिस ये जा करणार्या वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका जीपला पोलिसांनी अडवले असता मी लष्करी जवान असल्याचं चालकाने सांगितले. त्यानंतर सदर जवान अन् पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर झटापटीत झाले. लष्करी जवानाने यावेळी पोलिस निरिक्षक भागिले यांना जबर मारहाण केली.
दरम्यान, लष्करी जवानाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकारामुळे काही वेळ नगर नाका परिसरात बघ्यांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. सदर जवानाच्या गाडीवर एनएसजी कमांडो असे लिहिले असून तो आपण जवान असल्याचे सांगत आहे. पुढील तपास औरंगाबाद पोलिस करत आहेत.




