हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिशा सालियन मृत्यूप्रकरणात (Disha Salian Death Case) मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करून महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एका माजी मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विधानसभेत हा मुद्दा गाजला आहे. यावेळी, संबंधित माजी मंत्र्याला तात्काळ अटक करून चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे.
महत्वाचे म्हणजे, आज विधानसभा अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि अमित साटम (Amit Satam) यांनी या प्रकरणाची जोरदार दखल घेतली. त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव अप्रत्यक्षपणे घेत त्यांच्यावर संशय व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली. या मागणीला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील पाठिंबा दिला.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी स्पष्टीकरण देताना सांगितले की, या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे, मात्र अद्याप अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही. “आम्ही न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देत, “जर कोणावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाले, तर त्याला अटक करून चौकशी करावी लागते. त्यामुळे मविआच्या काळातील त्या मंत्र्यावरही तत्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली.
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेत महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा सहभाग असल्याचा त्यांना संशय आहे. भाजप आमदार अमित साटम यांनीही सभागृहात हा मुद्दा जोरदार उपस्थित करत, “मुंबई ही स्वप्ननगरी आहे. येथे देशभरातून तरुण-तरुणी करिअर करण्यासाठी येतात. मात्र, जर कोणी पॉवरफुल असेल किंवा कोणाच्या घरात सोन्याचा चमचा असेल, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असे होऊ नये,” असे म्हणाले.
त्याचबरोबर, त्यांनी सरकारला सवाल केला की, “एसआयटी चौकशीचा अहवाल कधी येणार? दिशा सालियनच्या वडिलांनी चार मित्र, एक मंत्री आणि त्या वेळी मुंबईच्या महापौरांचे नाव घेतले आहे. मग सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे का?” सध्या याच प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.