साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहा दिवसांपूर्वी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात बोरगाव पोलिसांना अखेर यश आले आहे. प्रमोद अंकुश लोखंडे (वय -42,रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने संशयितास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, संशयित प्रमोद लोखंडे हा बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शेतगडी म्हणून कामाला होता. 8 ऑगस्ट रोजी सकाळी त्याने एका साडेतीन वर्षाच्या बालिकेला चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यातील एका खोलीत तिच्यावर अत्याचार केला. याची माहिती पीडित बालिकेच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी त्याच दिवशी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पळून गेला होता. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाला सुरवात केली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

तपासादरम्यान संशयिताचा मोबाईल घटनास्थळीच सापडल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना जिकरीचे झाले होते. मात्र, सपोनि चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार हणमंत सावंत, उत्तम गायकवाड, प्रशांत मोरे, राजू शिखरे, किरण निकम, दादा स्वामी व संजय जाधव ही टीम संशयिताला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. संशयिताच्या मूळ गावीही अनेकदा तपास पथक गेले होते. मात्र, संशयिताचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर संशयित हा त्याच्या मूळ गावी आल्याची माहिती पोलिसांना समजल्यावर टीम तात्काळ वेळापूर (सोलापूर) येथे गेली व बुधवारी दुपारी त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. जिल्हा न्यायालयात संशयितास हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती बोरगाव पोलिसानी दिली.