सांगली प्रतिनिधी । इस्लामपूर येथे निघालेल्या जयंत पाटील यांच्या मिरवणूकीमध्ये गर्दीचा फायदा घेवून दागिने लुटणार्या टोळीतील अजित थोरात व सुभाष थोरात या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच राजारामबापू कारखान्यावरून ट्रॅक्टर चोरून नेणारा समीर उर्फ सर्फराज शेख यालाही इस्लामपूर पोलिसांनी ट्रॅक्टरसह अटक केल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे.
दरम्यान ‘महाविकासाआघाडी’ मधील मंत्री जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी ८ डिसेंबर रोजी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरटयांच्या टोळीने तब्बल १० ते १२ तोळे सोने लुटले होते. याप्रकरणी माणिक पाटील यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी तपास केल्यानंतर गर्दीमध्ये संशयितरित्या फिरणारे अजित थोरात व सुभाष थोरात या दोघांना अटक करण्यात आली. या टोळीतील अन्य तिघे साथीदार फरार असून त्यांच्याकडे सोन्याचा ऐवज असल्याची माहिती आहे.
लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येणार आहे. तसेच राजारामबापू सह.साखर कारखाना येथील वाहनतळावर भडकंबे येथील अमोल मोरे यांच्या मालकीचा टॅक्टर हा ऊसाच्या ट्रॉलीसह लावला होता. ९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरटयाने ऊसाच्या ट्रॉलीपासून दिड लाख किंमतीचा ट्रॅक्टर सोडवून चोरून नेला होता. याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तांत्रिक मदत व माहितीच्या आधारे या गुन्हयातील आरोपी समीर शेख यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात इस्लामपूर गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले.