औरंगाबाद – महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळात पारदर्शक कारभारांचा दावा केला जात असला तरी ठरावांची मात्र लपवाछपवी केली जात आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महिनाभरात 22 ठराव मंजूर केले. यातील एक ठराव रचना विभागाचे प्रभारी निवृत्त उपसंचालक जयंत खरवडकर यांना फेरनियुक्ती देण्याचा आहे. पण उर्वरित 21 ठरावांची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या ठरावात दडलंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आस्तिककुमार पांडेय यांनी आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक ठराव मंजूर केले आहेत. त्यात कोविड काळात उपाययोजना करण्यासह अधिकाऱ्यांना पदोन्नती, निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेणे, यासह इतर महत्त्वांच्या ठरावांचा समावेश आहे. प्रशासकीय काळात ठराव गुपचूप मंजूर केले जात आहेत. विषयांचे गठ्ठे एकाचवेळी बाहेर येत आहेत. नगर विकास विभागाचे सचिव दिलीप सूर्यवंशी निवृत्त झाल्यानंतर प्रशासकांनी या विभागाचा पदभार उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे दिला आहे. गेल्या महिनाभरात २२ ठराव घेण्यात आले आहेत. पण यातील एकाही ठरावाची माहिती समोर आलेली नाही. ठरावाविषयी माहिती विचारली असता, नगरसचिव विभागातून उपायुक्तांना विचारा, असे सांगण्यात आले तर श्रीमती थेटे यांनी ठरावांच्या प्रती देण्यास सांगते असे म्हणत, टाळाटाळ केली.
खरवडकरांचा ठराव आला आणि नगररचना विभागाचे निवृत्त प्रभारी उपसंचालक जयंत खरवडकर यांना फेरनियुक्ती देण्याच्या ठराव प्रशासनाने गुपचूप घेतला आहे. यासंदर्भात माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी नगरविकास विभागाकडे तक्रारी केल्यानंतर असा ठराव झाल्याचे समोर आले. या ठरावाविषयी विचारणा केली असता, आस्थापना विभागाने ठरावाची प्रत आणली आणि त्यावर नंबर टाकून परत नेली, असे नगर सचिव विभागातून सांगण्यात आले. तर आस्थापना विभागाने आम्ही ठराव तयार केला होता, तो नगर रचना विभागाला पाठविण्यात आला. आता त्याची प्रत आमच्याकडे नाही, असे सांगितले.