औरंगाबाद – संपकरी कर्मचारी कर्तव्यावर परत येत नसल्याने एसटी महामंडळाने पर्यायी मार्ग शोधला असून सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात 50 कत्रांटी चालकांना नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान कंत्राटी चालकाच्या मदतीने प्रशासनाने सोमवारी 15 एसटी बसेसमध्ये प्रवाशी घेऊन जात असतांना संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत एसटीच्या या निर्णयाचा निषेध केला. या कर्मचाऱ्यांना 48 दिवसांचे प्रशिक्षण न देताच त्यांच्या हातात स्टेअरिंग देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
मागील दोन महिन्यापासून एसटीचे चालक-वाहक संपावर गेले आहे. जो पर्यत विलिनीकरण होत नाही तो पर्यत माघार घेणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शासनानेच चालक पुरविण्याची जबाबदारी मुंबई येथील अस्तीत्व मल्टीपर्पज सर्व्हिस या एजन्सीला सोपविली आहे. या एजन्सीने सोमवारी औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाला 50 चालक दिले. या चालकांमार्फत विविध मार्गावर लालपरीची सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांनी खाजगी एजन्सीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या चालकाचा विरोध करीत बसस्थानक परिसरात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. या घटनेनंतर पोलिस आणि एसटी प्रशासनाने मध्यस्थी करत खासगी कंत्राटी चालकांच्या ताब्यातील लालपरी विविध मार्गावर रवाना केल्या. सोमवारी दुपारी 15 कंत्राटी चालक हे आपल्या कर्तव्यावर हजर झाले. हजर झालेले चालक हे लालपरीत प्रवासी घेऊन सिल्लोड, कन्नड, पैठण आणि नगरकडे रवाना झाले.
आणखी दोन कर्मचारी बडतर्फ –
औरंगाबाद विभागात संपकरी कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोमवारी दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आतापर्यत बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही 69 वर जाऊन पोहचली आहे.