राज्यात ठाकरे सरकार येताच लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांत भरगोस वाढ होईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे महिलावर्गत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सरकारमधीलच आमदार रवी राणा आणि महेश शिंदे यांनी मात्र आम्हाला आशीर्वाद नाही दिला तर तुमचे १५०० रुपये काढून घेऊन असा दम महिलांना दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. यावरून शिवसेना ठाकने सामना अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आहे. तसेच निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे सरकार आलं तर लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांत भरगोस वाढ होईल अशी ग्वाहीही दिली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

पैशांचा वापर करून मते विकत घेण्याचा फंडा म्हणून राज्य सरकारने आता ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. बहिणींच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये सरकारी तिजोरीतून जातील व त्या बदल्यात या बहिणींनी घटनाबाहय सरकारला मते द्यावीत असे एकंदरीत नियोजन आहे. म्हणजे सरकारी पैशांनी मते विकत घेण्याची ही योजना आहे. हे आम्ही म्हणत नसून सरकार पक्षाचे आमदार व नेतेच तसे वक्तव्य करून लाडक्या बहिणींना धमक्या देऊ लागले आहेत. सरकारचे एक लोचट मजनू आमदार रवी राणा यांनी अमरावतीत जाहीर केले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत मलाच मते द्या, नाहीतर तुमच्या खात्यातून ‘लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये काढून घेईन. ही धमकीच म्हणायला हवी. भाजपची लाडकी बहीण व रवी भाऊची लाडकी पत्नी नवनीत राणा यांचा दारुण पराभव अमरावतीच्या सुजाण जनतेने केल्यापासून राणा महाशयांचा तोल सुटला आहे व ते मतदारसंघातील बहिणींना धमक्या देऊ लागले आहेत. राणांपाठोपाठ मिंधे गटाचे एक आमदार महेश शिंद यांनीही असेच फूत्कार सोडले आहेत. “विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केले तर ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळून टाकू, अशी धमकी या महाशयांनी दिली आहे.

वास्तविक पैसा सरकारचा, योजना सरकारची आहे. पुन्हा हा सरकारी पैसा काही मुख्यमंत्री महोदयांच्या खिशातून आलेला नाही. त्यामुळे या सरकारी योजनेचा लाभ बहिणींनी घ्यायला हवा, पण पैशांच्या बदल्यात मत हवे असा फूत्कार सरकार पक्षाचे लोक सोडत आहेत. फक्त रवी राणाच नव्हे, तर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार, मंत्री, पदाधिकारी याच सुरात बोलत आहेत. ही बाब निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. राज्यातील भगिनींनी सध्या हे 1500 रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच या 1500 मध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा. रवी राणा यांच्यासारखे सरकारी लोचट मजनू लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे काढून घेण्याची भाषा करतात हा समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा पैसा यांच्या बापजाद्यांचा आहे काय किंवा सरकारी लुटीतला आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

मिथ्यांचे राज्य हे पेशांचे राज्य आहे. पेशांतून आलेले राज्य हे बदफैलींचे राज्य असते. तसे नसते तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता. एकीकडे बहीण म्हणून दरमहा 1500 रुपये देण्याच्या बतावण्या सरकार करीत आहे आणि दुसरीकडे आम्हाला मत दिले नाही तर हे पैसे तुमच्या खात्यातून काढून घेऊ, ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळू अशा जाहीर धमक्या सत्तापक्षातील लोचट मजनू [देत आहेत. मिधे सरकारची खरी ‘नियत’च त्यामुळे चव्हाटय़ावर आली आहे. राज्यातील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील, याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही! असं म्हणत सामनातून सरकारवर निशाणा साधला आहे.