औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन नंतर कसेबसे शासनाने दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुन्हा एकदा सोमवारपासून नियमित शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी उपस्थिती संख्येवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिवाळीच्या सुट्यांमुळे शिक्षणात खंड पडला. आता शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मागील पंधरा ते वीस दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने एसटी सेवा बंद आहे. ग्रामीण भागात जवळपास ५० ते ६० टक्के विद्यार्थी जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा- विद्यालयात जाण्या-येण्यासाठी एसटी बसने प्रवास करतात. सध्या बससेवा बंद असल्यामुळे खासगी वाहनांकडून अवाजवी शुल्क घेतले जात आहे. तो खर्च विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. गावापासून शाळेचे अंतर अधिक असल्यामुळे अनेक मुले बसचा पास काढून शाळेत ये-जा करतात. पण, संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत.
विशेषतः मुलींची अडचण वाढली आहे. सध्या शहरातील अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अवाजवी खर्च टाळण्यासाठी एका दुचाकीवर धोकादायक पद्धतीने चार-चार विद्यार्थी प्रवास करताना दिसून येत आहेत.