कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला कृष्णाकाठची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सन 2022-23 ते 2026-27 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत कराड तालुका सहकारी संस्थांचे उपनिबंधक संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधनाता डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 1971 साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेने स्थापनेपासूनच ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी व गोरगरीबांना अर्थसहाय्य केले आहे. डॉ. सुरेशबाबांनी बँकेला संघर्षाच्या काळात टिकवून ठेवण्याचे महत्वाचे काम केले. या संघर्षातून वाटचाल करत बँकेने आजची ही प्रगती साधली आहे. 2003 साली चेअरमनपदाची संधी मिळाल्यानंतर संचालक मंडळाच्या सहकार्याने मला बँकेचा विस्तार करता आला. गेल्या 10 वर्षात बँकेचा एन.पी.ए. शून्य टक्के राहिला असून, बँकेला आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आर्थिक संस्था म्हणून ओळखले जाते. तसेच बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 18.53 टक्के इतके आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा 4 जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र पसरले असून, लवकरच राज्यभर कार्यक्षेत्र मिळावे, अशी आम्ही मागणी केली आहे. बँकेला विविध संस्थांकडून गेल्या अनेक वर्षात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 30 जूनअखेर बँकेचा एकूण व्यवसाय 771 कोटींहून अधिक झाला असून, मार्च 2023 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 1000 कोटीपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
यावेळी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात यांची सातारा जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनिबंधक कार्यालयातील मुख्यम लिपिक एफ. एस. गावित, बँकेचे नूतन संचालक शिवाजी पाटील, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, गिरीश शहा, रणजीत लाड, प्रदीप थोरात, नामदेव कदम, विजय जगताप, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, अनिल बनसोडे, संतोष पाटील, नारायण शिंगाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, भगवान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.