पालखीतून अंत्ययात्रा काढून मुलाने फेडले आईच्या कष्टाचे पांग; एका वर्षापूर्वीच केली होती तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या काळात मुलांना किती लाखोच्या घरात पगार असला तरी त्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात राहत असलेले दिसतात. तर आई वडील म्हातारे झाले की त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येण्याच्या घटना देखील आपल्याकडे घडतात. मात्र या सगळ्यात उंदरवाडी येथील एका मुलाने आईवरील प्रेम दाखवून दिले आहे. या ठिकाणी आईची शेवटची इच्छा म्हणून मुलाने तिची अंत्ययात्रा पालखीतून काढली आहे. सध्या मुलाने केलेल्या या कृतीची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.

कागल तालुक्यातील उंदरवाडी गावात आईचे अंत्ययात्रा पालखीतून काढल्याची घटना घडली आहे. या मुलाने आई वारल्यानंतर तिची पालखीतून अंत्ययात्रा काढण्यात यावी यासाठी एक वर्षा आधीच ही पालखी तयार करून ठेवली होती. बुधवारी मुलाच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यानेही पालखी बाहेर काढली आणि यातूनच अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रासाठी संपूर्ण गाव गोळा झाला होता. या सर्वांना समोर पालखी बघितल्यानंतर आश्चर्य वाटले. मात्र त्यानंतर मुलाने आपली भूमिका मांडत अंत्ययात्रा पालखीतून काढली.

दरम्यान, संबंधित मुलाचे नाव मारुती पाटील असून ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. बुधवारी त्यांच्या आईची म्हणजेच, श्रीमती भगिरथी शिवाजी पाटील यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. मारुती यांच्या आईने त्यांचा सांभाळ खूप कष्ट सहन करत केला. आईने वणवण मोल मजुरी करत मुलांना लहानाचे मोठे केले. त्यामुळे मारुती यांनी तिला विचारून हयात असताना तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी नातेवाईकांना बोलावून आपल्या आईचे पाद्यपूजन केले होते.

आईची अंत्ययात्रा पालखीतून काढण्यात यावी यासाठी त्यांनी सरवडे येथील सुतार बंधूकडे पालखी बनवण्याचे काम दिले होते. हीच पालखी अंत्ययात्रेवेळी वापरण्यात आली आहे. दरम्यान, एखाद्या मुलाचे आपल्या आई वरील प्रेम दाखवणारी ही जिवंत त्या घटना उंदरवाडी येथे घडली आहे. तसेच, सोशल मीडियावर देखील मारुती यांनी केलेल्या कृतीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.