हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकताच दिल्लीच्या नविन संसद भवनाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या उद्घाटन समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित इतर अनेक खासदारमंडळी उपस्थित होते. परंतु या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले नाही. या मुद्द्यावरून नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मोदी सरकारवर आणि सनातन धर्मावर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विधवा स्त्री असल्यामुळे आणि आदिवासी असल्यामुळे त्यांना उद्घाटनाचा मान देण्यात आला नाही” असा गंभीर आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी लावला आहे.
मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलत असताना उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हणले की, “नव्या संसद इमारतीचे उद्धाटन करण्यात आले. भाजपने उद्धाटनासाठी तमिळनाडूमधून अधिनाम घेतला. पण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आणि आदिवासी समाजातून येतात. हाच सतानत धर्म आहे का? म्हणून आम्ही याविरुद्ध आवाज उठवत राहू” उदयनिधी यांनी केलेल्या टीकेमुळे आता राजकीय वर्तुळात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि मंत्री उदयनिधी हे सतत सनातन धर्मावर टिपणी करताना दिसत आहेत. त्यांच्या या ठिकाणवर भाजपकडून देखील प्रतिउत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे नुकत्याच उदयनिधी यांनी केलेल्या टीकेवर अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘या लोकांना आपला धर्म नष्ट करायचा आहे’ असे प्रत्युत्तर अमित शहा यांनी उदयनिधी यांना दिले आहे. तसेच, उदयनिधी यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देण्याच्या सूचना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, देशात लवकरच आगामी निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये तमिळनाडू सरकार या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरू शकते. तसेच, देशाच्या नावावरून जो वाद निर्माण झाला आहे तो मुद्दा देखील विरोधक आगामी निवडणुकांमध्ये उचलून धरू शकतात.