सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा येथे नगरपालिके समोरच मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या पाणी गळतीबाबत अनेकवेळा सांगूनही त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने भाजपच्या नगरसेवकाने आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने अंदोलन केले. नगरसेवकाने पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत कोडगुल यांच्या केबिनबाहेर पाणी ओतून निषेध केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथे नगरपालिकेच्या समोर एक चेंबर फुटल्याने त्यातून पाणी गळती सुरु आहे. या पाणी गळतीमुळे जवळपास हजारो लिटर पाणी वाहुन जात आहे. या प्रकाराबाबत भाजपचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी पालिका प्रशासनाला माहिती दिली. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा नगरसेवक काळेकर यांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला.
नगरसेवक काळेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आज नगरपालिकेच्या समोर येऊन पालिकेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत कोडगुल यांच्या केबिनबाहेर पाणी ओतले. पालिकेने तत्काळ गळती न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नगरसेवक काळेकर यांनी दिला आहे.




