आषाढी पालखी सोहळा परंपरे नुसार निघणार ; राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेची भूमिका

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि संस्कृती सोहळा समजल्या जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळयावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरेला धरून शासनाच्या सहकार्याने यावर्षीचा आषाढी पालखी सोहळा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी मांडली.

आषाढी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी सोहळा निघणार का ? याविषयी संभ्रम कायम आहे. या संदर्भात आज बुधवार (दि.६) रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख आणि इतर महाराज मंडळींची पंढरपुरात व्हीडीओ कॉन्फरन्स झाली.

त्यामध्ये राणा महाराज वासकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेला धरून काढणे शक्य असल्याची भूमिका मांडली. यावेळी वासकर महाराज म्हणाले आषाढी पालखी सोहळयाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा यापुढेही कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही प्रमाणात सावट निर्माण झाले आहे. असे असले तरी पालखी सोहळा मोठ्या थाटात आणि डामडौलात काढण्याचा आमचा विचार आहे. यावेळी सरकारने जे नियम आणि अटी घालून दिल्या जातील त्या प्रमाणे आम्ही पालखी सोहळा काढू असे वासकर महाराज यानी सांगितले.

आषाढी एकादशी सोहळा अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. वारीच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 13 जूनला तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे 12 जून रोजी प्रस्थान होणार आहे. तसा पालखी सोहळा प्रमुखांनी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. परंतु सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढी पालखी सोहळया बाबतची उत्सकुता शिगेला पोचली आहे. याच संदर्भात राणा महाराज वासकर यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here