सोलापूर | पंढरपूर लाडक्या पांडुरंगाची प्रथेनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंदिरात महापूजेच्या वेळी मंदिरात केवळ ठाकरे फॅमिलीच असणार आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजकीय नेत्याला प्रवेश नसेल. तसेच विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या भाविकांनाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे, कारण 18 जुलै ते 22 जुलै असा चार दिवस संचारबंदी असणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून शनिवारी मंदिर समितीचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांची अशी एकूण 145 जणांची तुकाराम भवन येथे चाचणी करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या सर्वांना मंदिरातील कार्यक्रमास प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाडी यांनी दिली.
या महापूजेच्या निमित्ताने मंदिर समिती प्रशासनाची लगबग सुरू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा सजविण्यात आला आहे. शासनाने चालू वर्षी आषाढी वारीसाठी मानाच्या 10 मानाच्या पालख्यांचे पादुकांना ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी 19 जुलै रोजी पंढरपूर मध्ये येण्यास परवानगी दिली आहे.
आषाढी यात्रेच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी 17 जुलै ते 25 जुलै अशी संचारबंदी करण्याबाबत आदेश आले होते. मात्र संचारबंदीचा कालावधी कमी करावा अशी मागणी अनेक लोकांमधून होत होती. त्यानुसार पंंढरपूर तालुक्यातील 9 गावातील संचारबंदीचा कालावधी आता 18 जुलै ते 22 जुलै असा चार दिवसांचा करण्यात आला आहे. मात्र 17 जुलै ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूरकडे जाणारी व येणारी एस.टी.सेवा, खाजगी बससेवा बंद करण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे कोणी उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारोंचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.