हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोफायनान्स सारख्या अत्यंत जटील आणि आव्हानात्मक क्षेत्रात मागील २३ वर्षे सातत्याने कार्यरत राहून अनेक अग्रगण्य संस्थांच्या यादीत स्थान मिळवणारी पर्वती स्वयंरोजगार संस्था. पुण्यासारख्या झपाट्याने वाढत असलेल्या आणि विकासाकडे वाटचाल करणा-या शहरामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या आलेल्या ‘पर्वती स्वयंरोजगार तथा ‘पर्वती स्वयंविकास सहकारी संस्थेचे’ संस्थापक अध्यक्ष अशोक शंकर देशमुख यांचं २१ एप्रिल २०२३ रोजी कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील २२ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या मदत आणि मार्गदर्शनाने मला ज्या गोष्टी शिकता आल्या त्या अमूल्य आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत इतक्या वर्षाचे ऋणानुबंध असले की आठवणींची, अनुभवांची पोतडीही मोठीच असते. याच आठवणींना उजाळा देणारा हा लेखनप्रपंच..!
अशोक देशमुख यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देऊर या एका लहानशा गावातील एक सामन्य शेतकरी कुटुंबातला. संपूर्णत: ग्रामीण पार्श्वभूमी आणि अतिशय बेताच्या आर्थिक परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं. शेती करणं कौटुंबिक गरज असली तरी शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाने आपण आणखी समृद्ध बनू हे समजलेल्या अशोक सरांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा गुण त्यांच्या रक्तात होता. यामुळेच त्यांनी समाजकार्य (सोशल वर्क) या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेऊन करिअर करायचं ठरवलं. व्यावसायिक पद्धतीने सामाजिक कामात उतरण्याचं त्यांनी मनाशी पक्कं केलं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८४ साली त्यांनी मुंबईमधील ‘कास्पप्लान’ या सामाजिक संस्थेत कामाला सुरुवात केली. या ठिकाणी त्यांनी १३ वर्षं काम केलं. या संस्थेत सामान्य कर्मचारी ते प्रकल्प व्यवस्थापक या सर्व जबाबदा-या पेलताना त्यांचं व्यावसायिक व्यक्तिमत्व खुलत गेलं आणि समाजभान व्यापक व्हायलाही मदत झाली. १९९७ साली या संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईतील काम सोडल्यानंतर त्यांनी पुणे शहरात स्थलांतर केलं. सतत नवनवीन कल्पना राबवून समाजहितासाठी झटणाऱ्या देशमुख सरांनी १४ जुलै १९९९ रोजी विकास युवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याकडे वाटचाल सुरू केली. हेच काम विस्तारत असताना त्यांनी २६ सप्टेंबर २००२ रोजी पर्वती स्वयंरोजगार संस्थेची स्थापना केली.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या पर्वती गावठाण परिसरात पुण्यातले हजारो कष्टकरी बांधव राहतात. या लोकांसाठी ही संस्था जणूकाही वरदान ठरू लागली. याच संस्थेचा विस्तार करून त्यांनी ७ ऑगस्ट २०१४ रोजी पर्वती स्वयंविकास सहकरी संस्थेची स्थापना केली. अशोक सरांच्या या कामाचा हेतू लक्षात घेऊन त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा नामोल्लेख करणंही याठिकाणी आवश्यक आहे. फ्रान्स यादेशातील इंटरएड या देणगी देणा-या कंपनीचे प्रतिनिधी फ्रान्सिस झेविअर आणि त्यांच्या पत्नी अन्क्लेअर हे विविध देशातील सामाजिक कामांना सढळ हाताने मदत करतात. या दाम्पत्याने देशमुख सरांच्या क्षमतांवर विश्वास दाखवला आणि देशमुख यांनी तो विश्वास सार्थ ठरवला.
समाजकारण हा व्यवसाय नसून हे एक व्रत आहे या विचारानेप्रेरित झालेली देशमुख सरांची विचारसरणी होती. याच विचारामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या आर्थिक-सामाजिक दुर्बल घटकातील कुटुंबांना ते विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकले. ज्या कुटुंबाची क्रयशक्ती कमी आहे, ज्या कष्टकरी बांधवांना हातावरचं पोट असलेलं काम सांभाळताना कसरत करावी लागते, जी कुटुंबं पुरेशा भांडवलावाचून एखादा उद्योग-व्यवसाय उभा करू शकत नाहीत अशा सर्वांना नियमांच्या चौकटीत राहून, पण संवेदनशीलपणे मदत करण्यासाठी देशमुख सरांनी मायक्रोफायनान्स क्षेत्रात काम करायचं ठरवलं. या पद्धतीने मदत करताना लोकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये किंवा या मदतीची अवहेलना होऊ नये यासाठी हे अर्थसहाय्य लघुकर्जरूपाने उपलब्ध करून देण्याचा सरांचा मानस होता. ट्रस्टच्या माध्यमातून काम केलं तर या कामावर मर्यादा येतील हे लक्षात घेऊन ‘नफा न कमावणारी कंपनी’ (सेक्शन २५ , कंपन कायदा १९५६) या अंतर्गत ‘पर्वती स्वयंरोजगार’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचा त्यांचा निर्णय अनेक अर्थांनी योग्य होता. कौटुंबिक विकासाचे विविध उपक्रम राबवताना पुणे शहरातील नागरी वस्त्यांमध्ये राहणा-या प्रत्येक गरजू कुटुंबाचा विचार झाला पाहिजे या अट्टहासाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केले. यामध्ये ० ते ५ या वयोगटातील मुलांच्या पालकांना पालकत्वाचे धडे देणा-या पूर्व बालसंगोपन कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कुटुंब विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या घरातच नाही तर मनात शिरून कसं काम करावे याचा वस्तुपाठ त्यांनी इतर महिलांना घालून दिला.
परिस्थितीने पिचलेल्या लोकांना आपल्या सहानुभूती किंवा दयेची आवश्यकता निर्माण करू नका, तर त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचे जग पाहण्याची दृष्टी निर्माण करा ही शिकवण त्यांनी अनेक कर्मचा-यांना दिली. संस्थेमध्ये काम करताना सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन समाजाप्रती ‘सहानुभव’ बाळगण्याची गरज असल्याचं ते नेहमी सांगायचे. शिवाय गरजू लोकांच्या गरजा काय आहेत या पेक्षा त्याची तीव्रता किती दाहक आहे याची प्रचिती येणं गरजेचं आहे अशी त्यांची धारणा होती.
पुण्यामध्ये झोपडपट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र त्यावेळी सहज उपलब्ध असणाऱ्या उत्पनाच्या साधनांची वाणवा जाणवू लागली होती. जोडीला बेरोजगारी, व्यसनाधीनता, जाणीव-जागृतीचा अभाव, आजारपणं या सगळ्या बाबींमुळे आधीच गरीबीच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांचे आयुष्य पुन्हा त्याच दुष्टचक्रामध्ये फिरत होते. शिक्षण नाही म्हणून दारिद्य आहे आणि दारिद्य आहे म्हणून शिक्षण नाही हे कालचक्र लोकांची पाठ सोडत नव्हते. त्यातच खाजगी नफेखोर सावकारांकडून महिलांना पैशाच्या आमिषाने कर्जाच्या जाळ्यात अडकवण्याचे सत्रही त्यावेळी सुरु झाले होते. खाजगी सावकरांच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणे आणि स्त्रियांचे होणारे आर्थिक शोषण थांबवणे या उद्देशाने पर्वती स्वयंरोजगार या कंपनीची स्थापना झाली. मायक्रोफायनान्स या कार्यक्रमची अभ्यासपूर्ण आखणी केल्यानंतर सुरु झालेल्या संस्थेच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच गेला.
देशमुख साहेबांच्या मेहनतीमुळे मागील २२ वर्षात पर्वती स्वयं रोजगार संस्थेला पुणे शहरातील ४० हजारांपेक्षा पेक्षा अधिक कुटुंबांपर्यंत मायक्रो फायनान्स कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करता आलं. यामुळे कष्टकरी कुटुंबांची आणि पर्यायने महिलांची सावकारी पाशातून सुटका झाली. स्वयंरोजगार या नावाला सार्थ करत अनेक लाभार्थी कुटुंबे, नव्याने आपला रोजगार उभारत पुण्यासारख्या ठिकाणी स्थिरावली ती कायमचीच.
याच्या जोडीलाच ‘आरोग्यनिधी’ सारख्या आगळ्या वेगळ्या आरोग्य सेवेने पर्वती संस्थेचे संपूर्ण कार्यक्षेत्र व्यापून टाकले. आरोग्याच्या प्रतीबंधात्मक सेवा हजारो लोकांपर्यंत पोहोचवताना लोकांच्या लाखो रुपयांची बचत देखील करता आली. सामाजिक जाणिवांची आणि निश्चित गरजांची जाण असलेला देशमुख सरांसारखा द्रष्टा माणूस विलक्षण होता. आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे कधी कधी लोकांना ते चिडखोर स्वभावाचे वाटायचे. अनेकवेळा मलादेखील त्यांच्या स्वभावाचा हा भाग खटकायचा. पण या स्पष्टवक्तेपणामुळेच संस्थेचे संपूर्ण कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे याची जाणीव मला काही काळाने झाली.
पुण्यातील नागरी वस्त्यांमधील कुटुंबांची एकूण सामाजिक – आर्थिक पार्श्वभूमी सरांनी अभ्यासलेली होती. त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत आणि आपली पोहच कुठपर्यंत आहे याचे त्यांना यथायोग्य भान होते. त्यामुळे कोणतंही काम हाती घेताना त्या बाबतचा सारासार विचार, कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि संस्थेची भूमिका याबाबत त्यांचे धोरण निश्चित होते. पुण्यामध्ये एका जागेपासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास आता १५ कार्यक्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. सरांच्या सहवासात अभ्यासपूर्ण आणि जबाबदारीचं काम करण्याची संधी मला मिळाली. याचा उपयोग माझ्या व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत होण्यास झाला. हजारो घरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मी माझ्या परीने जे योगदान देऊ शकले त्याचा प्रेरणास्रोत अशोक देशमुखच होते.
सरांचं व्यक्तिमत्त्व निर्णायक होतं. पुण्यातील समाजिक संस्थांच्या जाळ्यात त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाविषयी नेहमी आदरभाव व्यक्त केला जायचा. सरांच्या नावाचा प्रभाव मी जवळून अनुभवला. त्यांची हीच प्रतिमा संस्थेच्या संपूर्ण संचालक मंडळालाही माहीत होती. स्वीकारार्हही होती. सरांच्या निर्णयाच्या विरोधात जाणे किंवा वेगळा मतप्रवाह तयार करणे ही वेळ संचालक मंडळावर कधीच आली नाही. १९९९ पासून वेगवेगळ्या संस्थांच्या पायाभरणीमध्ये समान सहभाग असणारे सरांचे स्नेही पुरुषोत्तम खरोटे, तुकाराम पवार, प्रकाश तावरे , रवि पाटील आणि त्यांचे बालमित्र, सहकारी जनार्धन कुंभार या सर्व स्नेहीजन संचालकांनी सरांच्या क्षमतांवर विश्वास ठेवत त्यांना नेहमीच खंबीर साथ दिली. २००७ मध्ये संचालकपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर माझ्यामधील आत्मविश्वास दुणावला. यानंतर माझ्यातील क्षमतांचा ख-या अर्थाने विकास झाला.
संस्थेत छोटा किंवा मोठा असं कुणीच नव्हतं. संस्थेचा प्रत्येक कर्मचारी ही संस्थेची ताकद आहे या भावनेने देशमुख सरांचा सगळ्यांशी व्यवहार असायचा. संस्था म्हणजे मी नसून तुम्ही सगळे म्हणजे संस्था आहात हे सरांचं वाक्य रुढार्थाने सर्वपरिचित होतं. कामाच्या वेळी कठोर भूमिका घेणारे सर आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांशीच मनमोकळे वागायचे. कर्मचा-यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना संस्थाचालकाच्या भूमिकेतून बाहेर येऊन ते मित्रत्वाच्या नात्याने सहभागी व्हायचे. सरांच्या समोर येऊन बोलायला प्रत्येकाच्या मनात एक आदरयुक्त भीती नेहमीच असायची. मात्र एका वेगळ्याच आंतरिक संवेदनशीलतेचा हा माणूस होता. कर्मचा-याच्या बाजूचे अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेत असताना शरीराने / वाणीने तुम्ही कितीही कठोर वागलात तरी मनामध्ये त्यांच्या प्रति कायम मृदुता असायला हवी ही शिकवण त्यांनी इतर सहकाऱ्यांना दिली. या शिकवणुकीमुळे या ठिकाणी कामाच्या पलीकडची अनेक मैत्रीपूर्ण नाती मी बनवू शकले. लहानात लहान निर्णय घेण्यासाठी सखोल चर्चा करणे, स्वतःचं स्पष्ट मत मांडणे, फिल्डमधील कर्मचा-यांच्या बाबतीत प्रक्रियेची योग्यायोग्यता तपासणे यातून आमच्या विचारांमध्ये नेहमी स्पष्टता रहायची. त्यामुळे संस्थेच्या बाबतीत माझे विचार परिपक्व व्हायला मदत झाली. संस्थेप्रती माझी निष्ठा दिवसेंदिवस वाढत होती ती केवळ सरांनी आणि संचालक मंडळांने माझ्या कार्यक्षमतेवर दाखवलेल्या विश्वासामुळेच.
संस्थेचं काम केवळ आकडेवारीच्या हिशेबावर न पाहता गुणवत्तेच्या आधारावर वाढले पाहिजे असे त्यांचे सांगणे होते. त्यामुळे आपण किती काम करतो त्यापेक्षा ते कसे करतो आणि त्यातून नेमके काय साध्य होते हे आपल्याला समजायला हवं ही त्यांची भूमिका अत्यंत मार्गदर्शक आणि ग्राह्य होती. संस्थेची उंची तुम्ही किती कुटुंबांच्या आयुष्यात आनंद आणि वर्तणुकीत बदल आणू शकलात यावरून ठरवा हे तत्व सरांनी सर्व कर्मचाऱ्यांना आखून दिलं. सर चांगले आणि अस्सल ग्रामीण खवय्ये होते. त्यामुळे संस्थेच्या विविध कार्यक्रमावेळी सर्वांना रुचकर जेवण देण्यासाठी ते आग्रही असायचे.
२०१९ च्या मार्च महिन्यामध्ये सरांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. संस्थेच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिह्न उभे राहिले ते त्या दिवसापासूनच. मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या सरांनी धीराने कर्करोगासारख्या भयाण आजाराचा सामना केला. आवश्यक त्या प्रत्येक उपचारांना ते सामोरे गेले. मागील चार वर्षं त्यांची आजारपणाशी झुंज चालू होती. कोविड महामारीने संपूर्ण जग हादरून गेलं असताना पर्वती संस्थेचा कारभार सुरळीत चालू ठेवण्याचं आव्हान आमच्या समोर होतं. कर्करोगाची लढाई लढत असताना सरांच्या मनात संस्थेच्या अस्तित्वाची असलेली काळजी ते आम्हा संचालकांना बोलून दाखवायचे. त्यांची ही भीती रास्त असली तरी त्यातून मार्ग कसा काढायचा याचं बाळकडूही त्यांनी आम्हाला दिलंच. सर आता आपल्यात नाहीत त्याला महिना पूर्ण होईल, मात्र त्यांची आठवण रोज आल्याशिवाय राहत नाही. सुखाने हुरळून आणि दुःखाने खचून न जाता काम चालू ठेवा हा त्यांचा मूलमंत्र संस्थेचे कर्मचारी आज जगतायत. देशमुख सरांच्या जाण्यानंतर प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक विल्यम शेक्सपिअरच्या ‘शो मस्ट गो ऑन’ या वाक्याची प्रचितीच जणू आम्ही सगळे घेत आहोत.
संस्थेमधील सरांची उणीव कधीही भरून निघणार नाही. ६५ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या देशमुख सरांच्या अकाली जाण्याचं दु:ख मनात ठेवून त्यांच्या तत्वानुसार संस्थेची वाटचाल सुरू ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. गरिब कष्टकऱ्यांविषयी आत्मिक कळवळा असलेल्या आणि त्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी झटणाऱ्या या अवलियास विनम्र अभिवादन..!
लेखन :-
सौ. वासंती प्रसाद ताठे
माजी संचालक तथा सह-संचालक, पर्वती स्वयंरोजगार तथा पर्वती स्वयंविकास सहकारी संस्था, पुणे.
9168617799
संस्थेच्या कामाविषयी अधिक जाणून घ्या – http://www.parvatiswayamvikas.org