पुणे प्रतिनिधी | २०१९ ची निवडणूक अनेक कारणांनी रंजक बनली आहे. अमरावती, सोलापूरमध्ये उमेदवारालाच जखमी करणे, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे अशा घटना उघडकीस आल्या होत्या. या घटनांची सत्यता पुन्हा वादात सापडली होती. असाच काहीसा प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक अजिनाथ माने यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून त्यांची भर रस्त्याने धींड काढली. अशोक माने यांच्या निवडणुकीतील वर्तानबद्दल बसपाच्या कार्यकर्त्यांना संशय होता. अशोक माने यांनी प्रामाणिकपणे निवडणूक न लढवता अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
अशोक माने यांनी राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचं निवडणुकीपूर्वीच बोललं जात होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती. दरम्यान माने यांच्या चेहऱ्याला काळं फासण्यात आलं होतं. माने यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नसून त्यांनी राष्ट्रवादीला समर्थन करण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असल्याने एखाद्या व्यक्तीची मानहानी करून अशा प्रकारचं कृत्य करण्याची गरज होती का? असा सवाल संतप्त नागरिकांतून विचारण्यात येत आहे.