हिंगोली : काल रात्री 11 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे, नदी नाल्यांना पूर आला. या पुरात औंढा नागनाथ तालुक्यातील असोला नजीक असलेल्या ओढ्यात एक कार काही अंतरावर वाहून गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघेजण बचावले तर एका बालकाचा शोध सुरू आहे.
पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने चालकाने थेट पाण्यामध्ये गाडी घातली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये चालकासह इतर एकजण पोहत गाडीचे दरवाजे काढून बाहेर निघाले. पण गाडीत एक महिला व एक बालक अडकला. गाडीच्या चालकाने त्यांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा वेग वाढल्याने दोघेही वाहून गेल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यातील असोला तर्फे जवळा नजीक घडली.
त्यानंतर गाडीतून दरवाजे काढून बाहेर आपला जीव वाचवत दोघेजण बाहेर पडलेल्यानी आसोला गावातल्या नागरिकांना ही माहिती दिली. असोला येथील नागरिकांनी हट्टा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांच्यासह पथकाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने रात्रभर शोधकार्य सुरू केलं.
रात्री तीन वाजण्याच्या सुमारास असोला लगत असलेल्या उसाच्या शेतात यातील महिलेचा मृतदेह सापडला. मात्र अजूनही सोबत असलेला बालक सापडला नसून शोध कार्य सुरू आहे. ही घटना ११ जुलै रात्री ८ :३० च्या सुमारास घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हे कुटुंब परभणी कडून औरंगाबादकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. नागेशवाडी मार्गाने गेल्यानंतर सात ते आठ किलोमीटर दूर पडत असल्याने या मार्गाचा उपयोग त्यांनी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून हट्टा पोलीस तथा असोला परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने बालकाचा शोध सुरू आहे.
यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा ) येथील रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व मुलगा श्रेयस योगेश पडोळ हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला ) मार्गे औरंगाबादला निघाले होते. यावेळी चालक (योगेशला ) ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही. या दरम्यान वर्षा पडोळ,श्रेयस पडोळ हे पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके,चालक योगेश यातून बाहेर आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.