सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
लिंब (ता. सातारा) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अनोळखी युवकांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकारानंतर लिंबमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा निषेध म्हणून काल गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओमकार आनंदराव सोनमळे, साहिल संतोष सावळकर व अन्य एकावर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बंधू विपिन सर्जेराव सावंत यांनी फिर्याद दिली आहे.
या हल्ल्यात सावंत गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. सावंत हे रविवारी रात्री लिंब (ता. सातारा) हद्दीतील शेरी येथील एकाच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस साजरा करून ते रात्री साडेदहाच्या सुमारास परत येत होते. विठेबंदी विहीर नावाच्या मळ्यातील रस्त्यावर आले असताना संशयित युवकांनी त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. यामध्ये त्यांचा चेहरा व मानेवर वार झाले. हल्ला केल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. गंभीर जखमी असलेल्या सावंत यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती पसरताच कुटुंबीय, समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली, तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर लिंब परिसरात खळबळ उडाली.
याबाबत माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात पोचले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे; परंतु संशयितांनी कोणत्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला? तसेच हल्ल्याचे कारण काय हे अद्याप समजलेले नाही. जितेंद्र सावंत हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनीही रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच हल्लेखोरांना तातडीने पकडण्याचे आवाहन त्यांनी पोलिसांना केले आहे. गंभीर जखमी असल्यामुळे सावंत यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके तपास करत आहेत.