भुईंज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुलाला आरोपी न करण्यासाठी मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार खासगी व्यक्तीव्दारे स्वीकारताना भुईंजच्या सहायक पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सहायक पोलिस निरीक्षक निवास शंकर मोरे (वय- 55, तामजाईनगर कॉलनी, फ्लॅट नं. 25, सातारा) व खाजगी व्यक्ती संजय प्रभू माटे (वय- 40, रा. पिराचीवाडी असले, ता. वाई) नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुईंज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या मुलाला मदत करून त्याला आरोपी न करण्यासाठी लोकसेवक भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक निवास शंकर मोरे याने सदर प्रकरणात दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये लगेच रक्कम खासगी इसम संजय माटे याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले व ती लाच रक्कम माटे याच्याकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस अंमलदार प्रशांत ताटे, विशाल खरात, शीतल सपकाळ यांनी सापळा लावला. परिवेक्षण अधिकारी सुजय घाटगे असून यांना मार्गदर्शन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी केले.