बेन्नू लघुग्रह पृथ्वीवर धडकणार? होत्याचं नव्हतं करू शकतो हा लघुग्रह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांमध्ये समावेश होत असलेल्या बेन्नू या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये उभ्या असलेल्या 102 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग या अवाढव्य इमारतीएवढा बेन्नूचा आकार आहे. ही टक्कर होण्याची शक्यता गृहीत धरलीच, तर 24 सप्टेंबर 2182 हा दिवस पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीवर धडकला, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकेल.

पृथ्वीनजीकच्या बेन्नूसह अन्य 17 लघुग्रहांपासून पृथ्वीला असणारा धोखा याबद्दलचा लेख शास्त्रज्ञ डेव्हिड फार्नोचिया यांनी लिहिला होता. ‘बेन्नूपासून पृथ्वीला असलेल्या संभाव्य धोक्याची चिंता आता फारशी उरलेली नाही. तो धोका आता कमी झाला आहे. इसवी सन 2300 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच आहे,’ असं फार्नोचिया यांनी आपल्या लेखात सांगितले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हा लघुग्रह इ. स. 2135पर्यंत पृथ्वीपासून सव्वा लाख मैलांच्या टप्प्यात येईल. हे अंतर पृथ्वीच्या चंद्रापासूनच्या अंतराच्या साधारण निम्मं आहे.

बेन्नू हा उपग्रह अर्ध्या किलोमीटर व्यासाचा असून, त्यावर कार्बनचं प्रमाण मोठं आहे. पाणी आणि काही जड मूलद्रव्यंही त्यावर आढळून आली आहेत. या लघुग्रहाचं वय साडेचार अब्ज वर्षं आहे. भविष्यात या लघुग्रहाची पृथ्वीला धडक बसलीच, तर काय परिणाम होऊ शकतील, याचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी – रिगोलीथ एक्सप्लोअरर ही मोहीम तयार केली आहे. यानुसार सप्टेंबर 2016मध्ये निघालेलं यान ऑगस्ट 2018मध्ये बेन्नूच्या कक्षेत पोहोचले.

Leave a Comment