Atal Canteen Scheme : 5 रुपयांत पोटभर जेवण; अटल कॅन्टीनची देशभरात चर्चा

Atal Canteen Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Atal Canteen Scheme । मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात तुम्ही शिवभोजन थाळी नक्कीच खाल्ली असेल. फक्त १० रुपयांत त्यावेळी चपाती, भाजी, वरण आणि भात मिळायचा. गोरगरीब लोकांसाठी तर शिवभोजन थाळी वरदान ठरली होती. खास करून कोरोना काळात या शिवभोजन थाळीची किंमत उभ्या महाराष्ट्राला समजली होती. आता अशाच प्रकारे ५ रुपयांत जेवण देण्याचं काम दिल्लीत सुरु आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आजपासून अटल कॅन्टीन सुरु करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, लोकांना आता फक्त पुरेपूर जेवणाचा आनंद लुटता येतोय. दिल्लीतील गरजूंना परवडणारे आणि पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने 25 डिसेंबर रोजी 45 कॅन्टीनचे उद्घाटन (Atal Canteen Scheme) करण्यात आले. यानंतर उरलेली 55 कॅंटीन लवकरच सुरू होणार आहेत. दिल्लीतील नरेला, बवाना, शालिमार बाग, राजौरी गार्डन, ग्रेटर कैलाश यांसारख्या ठिकाणी या कॅन्टीन उघडल्या आहेत. या योजनेचा प्राथमिक उद्देश शहरी गरीब, रोजगार करणारा कामगार आणि झोपडपट्टीवासीयांना अतिशय परवडणाऱ्या किमतीत संतुलित आहार देणे आहे. प्रत्येक अटल कॅन्टीन दररोज दुपारी आणि संध्याकाळी ५०० लोकांना जेवण पुरवेल. अन्न वितरण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. या योजनेअंतर्गत बहुतेक कॅन्टीन झोपडपट्ट्या आणि वंचित भागांजवळ उभारण्यात आल्या आहेत, जेणेकरून गरजूंना अन्नासाठी लांब कुठं जायला लागू नये आणि ते सहज उपलब्ध होऊ शकेल.

थाळीमध्ये काय काय जेवण मिळतेय – Atal Canteen Scheme

अटल कॅन्टीनमध्ये दिली जाणारी थाळी अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे जी खाल्ल्याने खऱ्या अर्थाने माणसाचे पोट मनसोक्त भरेल. या थाळीत भात, चपाती, डाळ, भाज्या आणि लोणचे यांचा समावेश आहे. सर्वसामान्य माणसाला हे जेवण जरी ५ रुपयांत मिळत असले तरी या थाळीची मूळ किंमत ३० रुपये असल्याचं बोललं जातंय. दिल्ली सरकार या खर्चापैकी २५ रुपये अनुदान म्हणून देईल. सरकारचा असा विश्वास आहे की या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार अन्न मिळेल.