कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील गजानन हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले जिलेटीन कांड्या अखेर 9 तासानंतर ब्लास्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल सात लाख रुपये कॅश असलेल्या एटीएम उडवण्यात आले.
आज सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना मुंबईमधील मुख्य शाखेत समजल्याने तेथून कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना पाहता चोरट्यांनी हातातील स्प्रे पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मारले. तरीही त्यापैकी एका चोरट्यास पोलिसांनी पकडून ठेवले व त्याबाबतची माहिती दामिनी पथकाला दिली. या झटापटीत तीन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला तेथे घटनास्थळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, त्यासोबत कराडचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह बॉम्ब सदृश्यपथक दाखल झाले होते. तब्बल नऊ तासानंतर सात लाख रुपये असलेले एटीएम बॉम्बसदृश्य पथकाने उडवून दिले. यावेळी कराड -विटा मार्गावरती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जिलेटीन कांड्या उडवताना मोठा स्फोट झाला.