“मुलगी झाली हो” मालिकेचे शूटींग बंद पाडण्याचा संभाजी ब्रिगेडकडून प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

सातारा | स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ सध्या चांगलीच वादात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील अत्यंत लोकप्रिय पात्र विलास पाटील हे साकारणारे अभिनेते किरण माने याना तडकाफडकी मालिकेतून काढण्यात आले. यामुळे संपूर्ण राज्यातून संबंधित प्रकरणावर रोष व्यक्त केला जात आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष, नेते मंडळी आणि मुख्य म्हणजे कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या होत्या. यानंतर आता संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद करण्याच्या हेतूने ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यातील गुळूंब या गावात सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून तेथे संभाजी ब्रिगेडकडून चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरण माने प्रकरण दिवसागणिक चिघळताना दिसत आहे. एकीकडे कलाकाराची अश्या पद्धतीने गळचेपी करण्यामुळे सर्व स्तरांतून राग व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्यांनी आणि वाहिनीने परिपत्रकातून किरण माने यांच्यावर महिला सह कलाकारांसोबत गैरवर्तन केले असल्याचा आरोप लावला होता. या आरोपानंतर काही महिला सह कलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. दरम्यान किरण माने यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तर आज जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती दिली आहे.

किरण माने यांच्यावर मालिकेतील इतर महिला कलाकारांकडून गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. मात्र मानेंनी आधीच आपल्या राजकीय भूमिका घेण्यामुळे मालिकेतून काढून टाकल्याचे माध्यमांना स्पष्ट केले होते. यानंतर महिला कलाकारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसले. यातील एकीकडून मानेंवर आरो तर दुसरीकडून समर्थनाचे झेंडे फडकवले गेले आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने देखील निर्माते आणि वाहिनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच बहुजन समाजातील कलाकारांवर अन्याय केला असल्याचेही आता काहीजण बोलू लागेल आहेत. अशावेळी आता संभाजी ब्रिगेडने देखील आपली आक्रमक भूमिका घेत चित्रीकरणावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे.