सातारा | महसूल खात्यातील तलाठी, तहसिलदार, प्रांत आणि कलेक्टर यांना निवेदन दिले. मात्र, तत्कालीन तलाठी मनिषा शिंदे यांनी खोटा पंचनामा केला तसेच न्याय मिळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी संजय नेवसे यांनी स्वतः च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेने पोलिसांची चांगलीच भांभेरी उडाली. दरम्यान आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गेल्या 8 महिन्यापासून संजय नेवसे यांच्या मालकी हक्काच्या शेतात उत्खनन केले जात आहे. महसूल खात्याला याची कल्पना देऊन देखील तत्कालीन तलाठी मनीषा शिंदे यांनी खोटा पंचनामा करून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला. प्रदीप चौडिया यांच्याकडून आर्थिक लाभ करून घेतल्याचा आरोप नेवसे यांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याच्या नैराश्यातुन नेवसे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय नेवसे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आम्ही सरळ मार्गाने आंदोलन करायला गेलो तरी आम्हांला नोटीस देत आहेत. आमचे हात-पाय बांधत आहेत. चाैडिया यांना 49 कोटीचा दंडाची नोटीस दिली, मात्र वाहने जप्त केलेली नाहीत. आठ महिन्यापासून बेकायदेशीररित्या कामे चालू असताना त्याकडे शासन लक्ष देत नाही.