औरंगाबाद – एका 35 वर्षीय युवकाने थेट पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल समोर आला. युवकाच्या नातेवाइकांनी सदर युवक हरवला असून त्याचा मृत्यूचा बनावट दाखला सादर केला, म्हणून माझी लिपिकाची नोकरी गेली, त्यामुळे संबंधित नातेवाइकाविरोधात गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ‘त्याने’ आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सदर लिपिकास बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून मनोज आदेशराव कुलकर्णी असे त्या लिपिकाचे नाव आहे. त्याचे मनपरिवर्तन करून आत्मदहन रद्द करीत असल्याचे लेखी दिल्यानंतर त्यास सोडून देण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळात वरिष्ठ लिपिक असलेल्या मनोज आदेशराव कुलकर्णी (35, रा. शिवजागृत मंदिर, एम 2 रोड, एन 9) यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्याला एक पत्र दिले होते. पत्रात म्हटल्यानुसार ‘माझ्या नावे खोटा स्मशान परवाना सादर करून, गंगाखेड (जि. परभणी) येथे खोटा मिसिंग रिपोर्ट नोंदविण्यात आला. मला मारून टाकले असून, तसे खोटे लिहून दिल्याबाबत नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करणार असल्याचे पत्रात म्हटले होते. त्यामुळे बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक पोतदार, हवालदार शरद वाणी आदी पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपस्थित होते.
दरम्यान कुलकर्णी हे साडेबारा वाजेदरम्यान पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हातात पिशवी घेऊन येत असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घेतलेल्या झाडाझडतीत त्यांच्या पिशवीत बाटली आढळून आली. पोलिसांनी कुलकर्णी यांची मुख्यालयातील पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांची भेट घालून दिली. त्यानंतर त्यास बेगमपुरा पोलिस ठाण्यात आणून त्याचे मनपरिवर्तन केले. त्याचे समाधान झाल्यानंतर त्याने आत्मदहन रद्द करीत असल्याचे पोलिसांनी लेखी लिहून दिले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.