सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा अकार्यक्षमपणा, सभागृहातील पळपुटेपणा, अवैद्य व्यवसायाला खतपाणी घालणार्यांचा आगामी निवडणुकीत मतदार पंचनामा करतील. राष्ट्रवादीकडे अशी कर्तबगारी सिध्द केलेले चेहरे आहेत. हेच चेहरे घेवुन जयंत पाटील लोकांसमोर जावुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप विकास आघाडीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक वैभव पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. इस्लामपूर शहरात पालकमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे अकार्यक्षम शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला अधिकार्यांवर धावुन जाणारे खंडेराव जाधव यांच्यासह सोनेरी टोळीतील पदाधिकारी शहरातील निवडक नागरिकांच्या घरी जात आहेत.
पॅकेजबरोबर विकासाची व व्यक्तिगत कामाची आश्वासने नागरिकांना देवुन भुलभुलैय्या सुरु केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पॅकेजच्या संस्कृतीला शहरातील स्वाभिमानी मतदार भुलणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैभव पवार म्हणाले, 31 वर्षात सत्तेत असताना सर्वानुमते ठराव मंजूर करणार्या इस्लामपूर शहरात कोणतीच विकासकामे शिल्लक रहायला नको होती. असे न होता उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मोजक्याच बगलबच्यानी स्वतःचा विकास साधला.
हे जनतेच्या डोळ्यासमोर आल्याने सुज्ञ नागरिकांनी विकास आघाडी व शिवसेनेला सत्ता दिली. इस्लामपूर शहरातील जनतेने तुम्हाला 10 हजारांचे मताधिक्य दिले. शहराच्या विकासकामांसाठी आणलेला निधी तुम्ही बांधकाम विभागाकडे वर्ग केला. हा शहरातील मताधिक्य देणार्या मतदारांचा अपमान नव्हे का? पालकमंत्री झाल्यावर नगरपालिकेत आढावा बैठक घेण्याची तत्परता दाखवली का? नगरपालिकेत प्रशासक आल्यावरच बैठक घेण्याचे गौडबंगाल काय? शहरातील प्रशासक कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत हे कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही. असा सवाल वैभव पवार यांनी केला.