सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पुसेसावळी (ता.खटाव) येथील मुख्य चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा रात्रीच्या दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांनी अंतर्गत असलेले सीसीटिव्ही पैकी एक फोडल्याचे तर दुसऱ्याला चिकटपट्टी लावून इतर वायरिंग तोडून टाकली. तर अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनाचा वापर केला असून अंदाजे तिन ते चार व्यक्तींचा सामावेश यात असण्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले. सातारा जिल्ह्यातील कराड, नागठाणे आणि आता पुसेसावळी येथे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. त्यामुळे आता या चोरट्याच्या टोळीवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
घटनेची माहिती मिळताच औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पुसेसावळी दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास बिट अंमलदार राहुल वाघ करीत आहेत.